९ दिवसांत पोलीस ठाण्यात केले २००० वेळा कॉल; अटक केल्यानंतर वृद्ध म्हणतो, मला माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:43 PM2022-12-09T17:43:19+5:302022-12-09T17:52:27+5:30
एका वृद्ध व्यक्तीने ९ दिवसांत २०००हून अधिक वेळा पोलीस स्थानकांत फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
एका वृद्ध व्यक्तीने ९ दिवसांत २०००हून अधिक वेळा पोलीस स्थानकांत फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर व्यक्ती फक्त फोनच करत नव्हता, तर पोलिसांना फोनवरुन शिवीगाळ देखील करत होता. या वृद्धेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तपासात वृद्ध अनेक वर्षांपासून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र अलीकडच्या काही महिन्यांत त्यांनी हे कृत्य अधिक वाढले होते.
सदर घटना जपानमधील आहे. आरोपीचे वय ६७ वर्षे असून तो सैतामा प्रीफेक्चरल पोलीस ठाण्यात वारंवार फोन करून पोलिसांना अपशब्द वापरत होता. त्याने ९ दिवसांत जवळपास २०६० वेळा कॉल केला. या दरम्यान वृद्ध पोलीस कर्मचार्यांना कधी टॅक्सचोर म्हणत असत, तर कधी मूर्ख. तसेच तो शिवीगाळ देखील करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान आरोपीने पोलीस स्थानकांत हजारो फोन केले होते. तो दर ६ मिनिटांनी सरासरी एक कॉल करत असे. त्यामुळे पोलिसांची हेल्पलाइन सेवा विस्कळीत व्हायची. या प्रकरणी पोलिसांनी सदर वृद्धेला २८ नोव्हेंबर रोजी अटक केली होती.
'पोलीस एक दिवस मला पकडायला येतील'
अटकेनंतर, वृद्धाने आरोप स्वीकारला आणि म्हणाला, मला माहित होते की, एक दिवस पोलीस मला पकडण्यासाठी येतील. मात्र, वारंवार कॉल करण्यामागील हेतू त्यांने अजूनही सांगितला नाही. परंतु पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने फोन केल्याचे समजते. तपासादरम्यान आरोपीच्या फोन रेकॉर्डवरून तो अनेक वर्षांपासून हे कृत्य करत असल्याचे पोलिसांना समजले. पण अलीकडच्या काही महिन्यांत त्याने मर्यादा ओलांडली होती.