खेळायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् २९ तासांनी ७ वर्षीय मुलाचा मृतदेहच सापडला
By नारायण बडगुजर | Published: September 10, 2022 06:52 AM2022-09-10T06:52:51+5:302022-09-10T06:54:01+5:30
आदित्य हा गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता. त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला.
पिंपरी : खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेला मुलगा बेपत्ता झाला. ही घटना गुरुवारी (दि. ८) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. त्यानंतर अपहरण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता शुक्रवारी (दि. ९) रात्री उशिरा मुलाचा मृतदेह मिळून आला. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
आदित्य गजानन ओगले (वय ७) असे खून झालेल्या अपहृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (वय ४९, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी आदित्यचे अपहरण झाल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळायला जातो असे सांगून आदित्य हा गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता. त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला. मात्र शोध लागला नाही. त्यामुळे आदित्य याच्या आई वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका संशयित तरुणाकडे कसून चौकशी केली. त्यावेळी आदित्य याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आदित्य याचा मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर मिळून आला.
२० कोटी रुपयांची मागणी
मयत आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आदित्य हा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे हा अपहरणाचा प्रकार असल्याचे सांगितले जाते. मात्र, पोलिसांना यामध्ये वेगळाच संशय येत आहे. कारण, आरोपी आणि मयत मुलगा आदित्य एकाच सोसायटीत राहत होते.
पोलिसांचा २९ तास तपास
आदित्य हा बेपत्ता असल्याचे माहित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पिंपरी पोलीस ठाण्याचे स्थानिक तपास पथक तसेच गुन्हे शाखेचे गुंडाविरोधी पथक व इतर पथकांकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. या तपासात २९ तासांनंतर आदित्यचा मृतदेह मिळून आला.