पैशाच्या लालसेतून मित्रांनीच केला मित्राचा घात; विंचूरची घटना, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2023 09:08 PM2023-06-07T21:08:21+5:302023-06-07T21:08:33+5:30
पोलिसांकडून घटनेचा उलगडा
विंचूर : पैशांच्या लालसेने मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना विंचूर येथे घडली असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पांडुरंगनगर भागातील रहिवासी बाळासाहेब पोतले गुरुवार, दि.१ जून रोजी कॉटवर मृतावस्थेत आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस काॅन्स्टेबल प्रदीप आजगे, कैलास मानकर यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.
तपासादरम्यान व घटनास्थळाच्या निरीक्षणावरून तपास पथकास घातपात झाल्याचा संशय आल्याने बाळासाहेब पोतले यांचे मित्र रामदास सालकाडे व सुनील मोरे, दोघे रा. विंचूर यांचे दारू पिण्यासाठी पोतले यांच्याकडे वारंवार येणे-जाणे असल्याचे समजले; परंतु बाळासाहेब पोतले यांचा मृत्यू झाल्यापासून रामदास सालकाडे व सुनील मोरे हे गावातून निघून गेल्याची गोपनीय माहिती तपास पथकास मिळाली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित रामदास सालकाडे व सुनील मोरे यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता त्यांनी मित्र बाळासाहेब पोतले यांचे दारू पिण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्यास नाक व तोंड दाबून मारून टाकल्याची कबुली दिली.
तसेच पोतले यांचा मोबाइल, शर्ट-पँटमधील रोख रुपये व एटीएम कार्ड व चेकबुक, तसेच वॅगनर कारसह त्याठिकाणाहून पळ काढल्याचे सांगितले. संशयित आरोपी रामदास मारुती सालकाडे, रा. सालकाडे वस्ती, किसानवाडी, सुनील माणिक मोरे, रा. किसानवाडी, विंचूर यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवार, दि. ९ जूनपर्यंत पोलिस काेठडी देण्यात आली आहे.