गुजरातमधील दोन नामांकित कंपन्यांवर आयकर विभागाची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:40 PM2021-11-23T12:40:02+5:302021-11-23T12:42:13+5:30
IT Raids In Gujarat’s Ahmedabad : आयकर विभागाने 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आयकर विभाग तपास करत आहे. अहमदाबादमध्ये आयकर विभागाने एकाच वेळी 25 ठिकाणी छापे टाकले.
नील, अहमदाबाद: आयकर विभागाने गुजरातमधील एस्ट्रल आणि रत्नमणी मेटल्स या दोन नामांकित कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आयकर विभाग तपास करत आहे. अहमदाबादमध्ये आयकर विभागाने एकाच वेळी 25 ठिकाणी छापे टाकले.
दरम्यान, एस्ट्रल पाईपचे चेअरमन संदीप यांच्या अनेक ठिकाणांवर तपास सुरू आहे. तर रत्नमणी मेटल्सचे अध्यक्ष प्रकाश संघवी यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. या दोन कंपन्यांच्या इतर संचालकांचीही चौकशी सुरू आहे. गुजरातबाहेर 15 ठिकाणी सर्वेक्षण आणि छापे सुरू आहेत. या छाप्यात 150 हून अधिक आयकर अधिकारी सहभागी आहेत. या दोन्ही कंपन्यांशी संबंधित अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते. अनेक बेनामी व्यवहाराची कागदपत्रे सापडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाने रसायने आणि रिअल इस्टेटच्या उत्पादनात गुंतलेल्या गुजरातस्थित कंपनीवर छापा टाकून 100 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न बाहेर काढले होते. हे छापे वापी, सारीगम, सिल्वासा आणि मुंबई येथील 20 हून अधिक ठिकाणी टाकण्यात आले होते. एका निवेदनात, सीबीडीटीने म्हटले होते की, समूहाचे बेहिशेबी उत्पन्न आणि त्यांची मालमत्तांमधील गुंतवणूक दर्शविणारे दस्तऐवज, डायरी तपशील आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात आक्षेपार्ह पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
आयकर विभागाने सांगितले की, स्थावर मालमत्ता आणि कार कर्जांमधील गुंतवणूक आणि रोख व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही अधिकार्यांनी जप्त केली आहेत. छाप्यांदरम्यान अडीच कोटी रुपयांची रोकड आणि एक कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले, तर 16 बँक खात्यांमधून व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले.