महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयटीची छापेमारी, कोटींच्या रक्कमेसह दागिने केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:26 PM2022-03-03T15:26:13+5:302022-03-03T16:05:34+5:30
Income Tax Search Opreation : आतापर्यंत मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे.
मुंबई - प्राप्तिकर विभागाने (आयटी) २५ फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC), एका बड्या व्यक्तीसह त्यांचे जवळचे सहकारी यांच्या कराराची अंमलबजावणी करणाऱ्या काही कंत्राटदारांवर छापा टाकून जप्तीची कारवाई केली. आतापर्यंत मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या शोध मोहिमेदरम्यान गैरव्यवहाराची अनेक कागदपत्रे, पत्रके आणि डिजिटल पुरावे आढळून आले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले पुरावे हे कंत्राटदार आणि त्या व्यक्ती यांच्यातील जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट करत आहेत. या ३० पेक्षा अधिक स्थावर मालमत्तांची किंमत १३० कोटीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
या मालमत्तांमध्ये त्यांच्या नावावर, त्यांचे सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि बेकायदेशीररीत्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावे देखील सापडले आहेत. अनेक कोटींच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली पत्रके आणि फाईल्स सापडल्या आहेत आणि त्या जप्त केल्या गेल्या आहेत. ज्यांची नोंद संबंधित खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये केली गेली नाही.
कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड होते. या कंत्राटदारांनी २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शोध मोहिमेदरम्यान अघोषित रोख रु. २ कोटी आणि दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.