प्रिया स्कूटर ते आलिशान कारचा नंबर 4018; कोट्यवधींच्या साम्राज्यासाठी 'ही' गोष्ट ठरली लकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:02 AM2024-03-03T10:02:15+5:302024-03-03T10:06:20+5:30
तंबाखू व्यावसायिकाच्या 16 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस आणि इतर आलिशान वाहनांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वाहनांवर लिहिलेल्या क्रमांकाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील तंबाखू व्यावसायिकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दिल्लीतील बंसीधर टोबॅको कंपनीचे मालक के के मिश्रा यांच्या बंगल्यावर सापडलेली करोडो रुपयांची वाहने पाहून अधिकारी हैराण झाले होते, मात्र या वाहनांसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एक प्रिया स्कूटरही सापडली, जी खूप वर्षे जुनी आहे, परंतु घरात ती अधिक चांगल्या पद्धतीने सजवून ठेवलेली आहे.
तंबाखू व्यावसायिकाच्या 16 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयस आणि इतर आलिशान वाहनांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वाहनांवर लिहिलेल्या क्रमांकाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. सर्व वाहनांचा नंबर 4018 होता आणि जवळ उभ्या असलेल्या स्कूटरचा क्रमांक देखील 4018 होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रिया स्कूटर त्यावेळची आहे जेव्हा तंबाखू व्यावसायिक के के मिश्रा यांचा व्यवसाय सुरुवातीच्या टप्प्यात होता.
के के मिश्रा यांनी संघर्षाच्या काळात ही बजाज प्रिया स्कूटर खरेदी केली होती. केके मिश्रा यांच्या घरी ही स्कूटर आल्यापासून जणू काही त्यांची वेळच बदलली आहे. व्यवसायाला गती मिळाली आणि काही वेळातच के के मिश्रा यांनी आपलं साम्राज्य उभं केलं. कुटुंबीयांच्या मते ही स्कूटर त्यांच्यासाठी खूप लकी आहे. त्यामुळेच कोट्यवधी रुपयांच्या वाहनांपेक्षा स्कूटर जपून ठेवण्यात आली आहे. वेळोवेळी त्याची देखभाल देखील केली जाते. त्याचे पॉलिश आणि सिल्व्हर कोटिंग देखील पुन्हा केलं गेलं आहे, जेणेकरून स्कूटर अगदी नवीन दिसते.
आयकर विभागाने दिल्ली आणि कानपूरमधील तंबाखू व्यापाऱ्यांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत. या कालावधीत 60 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. साडेचार कोटींची रोकड सापडली आहे. तंबाखू कंपनीच्या खात्यांमध्ये फेरफार होत असल्याचा आयकर विभागाला संशय आला, त्यामुळे छापा टाकण्यात आला. कंपनीने आपली उलाढाल 20-25 कोटी रुपये दर्शविली होती, तर वास्तविक व्यवहार 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.