बापरे! 11.88 कोटींची रोकड अन् 1.93 कोटींच्या दागिन्यांचे घबाड सापडले; 700 कोटींच्या करचोरीने अधिकारी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 10:50 AM2021-04-01T10:50:12+5:302021-04-01T11:18:31+5:30
IT Raids Tax Evasion Worth Rs 700 Crore Revealed : आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान 11 कोटी 88 लाखांची रोख रक्कम तसेच 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिली आहे.
नवी दिल्ली - आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 11 कोटी 88 लाखांची रोकड अन् 1 कोटी 93 लाखांचे घबाड सापडले आहे. तब्बल 700 कोटींच्या करचोरीने अधिकारी देखील चक्रावले आहेत. कोट्य़वधीच्या रक्कमेसह 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने (IT) बुधवारी धाड टाकून केलेल्या कारवाईत 700 कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली.
आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान 11 कोटी 88 लाखांची रोख रक्कम तसेच 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात आलेले दोन्ही ग्रुप भूखंड व्यवहार तसंच बांधकाम क्षेत्रात आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, "कारवाईदरम्यान नियमांचं उल्लंघन करणारी अनेक कागदपत्रं, हस्तलिखित पुस्तके, करारनामे ज्यामधून बेनामी व्यवहार झाल्याचं दिसत आहे ती जप्त करण्यात आली आहे. तसेच काही खास सॉफ्टवेअर अॅपमधील आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधील सर्व डेटाही मिळवण्यात आला आहे."
आयकर विभागाची मोठी कारवाई! घरात सापडले घबाड, तब्बल 1 कोटीची रोकड जप्त, घटनेने खळबळhttps://t.co/dCWEJVHhCJ#tamilnaduassemblyelection2021#TamilNadu#IncomeTax#incometaxraid#money
— Lokmat (@MiLOKMAT) March 30, 2021
मोठ्या कारवाईतून 700 कोटींची बेहिशोबी मालमत्ता समोर आली असून त्याबाबत अनेक पुरावे हाती लागले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आयकर विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अण्णाद्रमुकचे (AIADMK) आमदार आर. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. आर. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अलगरासामी असं या चालकाचं नाव असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत.
गेल्या 9 ते 10 वर्षांपासून अलगरासामी आर. चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची AIADMK चा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. कोविलपट्टी गावातील थंगापंडी आणि मुरुगनंदम या दोघांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. 500 रुपयांच्या नोटांचे बंडलच्या बंडल सापडले आहेत. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आल्यानंतर तामिळनाडुच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली जात आहे. आयकर विभागाने याआधी देखील कारवाई केली आहे.