अमोल चव्हाणनेच ' त्या ' महिलेला एका महाराजाकडून आणून दिली ‘इच्छापूर्ती कुपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:04 PM2020-08-24T22:04:17+5:302020-08-24T22:06:07+5:30
या प्रकरणातील महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा तिच्याकडे एक इच्छापूर्ती कुपी आढळून आली होती...
पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या प्रकरणात कोथरुड पोलिसांनीअटक केलेल्या अमोल चव्हाण यानेच एका महाराजाकडून याप्रकरणातील महिलेला इच्छापूर्ती कुपी आणून दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. न्यायालयाने अमोल चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
खंडणीच्या या प्रकरणात कोथरुड पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोथरुड पोलिसांनी अमोल चव्हाण याला अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणातील महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा तिच्याकडे एक इच्छापूर्ती कुपी आढळून आली होती. त्यात तिने बावधनचा फ्लॅट व २ कोटी रुपये मिळावेत, अशी इच्छा व्यक्त केलेली चिठ्ठी आढळून आली होती. ही इच्छापूर्ती कुपी अमोल चव्हाण याने आणून दिल्याचे तपास स्पष्ट झाले आहे.चव्हाण याने या महाराजाचे कार्यालय दाखवले असून त्या महाराजाकडे तपास सुरु आहे.
अमोल चव्हाण याने कोणाच्या सांगण्यावरुन फिर्यादीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली हे सांगत नाही. यातील फरार आरोपी रवींद्र बऱ्हाटे याच्या सांगणेवरुन आपण व इतर काम करीत असल्याचे चव्हाण कबुल करीत आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून भेटलेला नाही, असे सांगत आहे. ज्या दुचाकीवरुन त्याने फिर्यादीला धमकी दिली. ती हस्तगत करायची आहे. अधिक तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयाकडे केली़ न्यायालयाने ती मान्य केली.