डिलिव्हरी बॉयला मोबाईल देणं पडलं महागात; क्रेडिट कार्डसोबत आले २ लाख बिल
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 30, 2023 04:33 PM2023-03-30T16:33:39+5:302023-03-30T16:33:53+5:30
कोपर खैरणेत राहणाऱ्या जितेंद्रसिंग संधू यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई : कुरियरद्वारे आलेले क्रेडिट कार्ड स्विकारताना डिलेव्हरी बॉयकडे काही वेळासाठी मोबाईल देणे व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. सदर कार्ड हाती मिळण्यापूर्वीच त्यावरून २ लाखाचा व्यवहार झाला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर खैरणेत राहणाऱ्या जितेंद्रसिंग संधू यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी एचडीएफसी बँकेकडे क्रेडिट कार्डसाठी केलेल्या अर्जनानुसार त्यांना ते देण्यात आले होते. हे कार्ड त्यांना कुरियर कंपनी मार्फत घरपोच मिळाले असता, डिलेव्हरी बॉयना व्हेरिफिकेशन कोड पाहण्याच्या बहाण्याने संधू यांचा मोबाईल स्वतकडे घेतला होता. यावेळी संधू हे घरात इतर कागदपत्रे हाताळत होते. काही वेळाने ती व्यक्ती त्यांना कार्ड देऊन निघून गेली असता, काही वेळातच त्या कार्डवर १ लाख ९८ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यावरून आपल्या कार्डची माहिती मिळवून त्याचा वापर झाल्याचा आरोप संधू यांनी करत बुधवारी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे कोपर खैरणे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.