तो साधू नाहीतर गंभीर गुन्ह्यातील १२ वर्षांपासून फरार गुन्हेगार होता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 05:50 PM2018-10-05T17:50:51+5:302018-10-05T17:56:13+5:30
ओळखले जावू नये या भीतीने तो वेगवेग ठिकाणी वेशभूषा करुन राहत होता त्याचा काही केल्या पोलिसांना मागमूस लागत नव्हता...
शिरूर: शिरूर, शिक्रापूर ,दौंड परिसरात खून, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे करून गेली १२ वर्ष फरार असणारा आरोपीचा पोलीस शोध घेत होते. परंतु, ओळखले जावू नये या भीतीने तो वेगवेग ठिकाणी वेशभूषा करुन राहत होता त्याचा काही केल्या पोलिसांना मागमूस लागत नव्हता.परंतु, पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चांभुर्डी ( ता.पारनेर ) येथे डोंगराळ भागात छापा टाकून आरोपीला अटक केली . रविंद्र उर्फ रव्या अशोक काळे ( मुळ रा. रांजणगांव मशिद ता. पारनेर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काळे याच्यावर २००६ साली शिरूर पोलीस ठाण्यात खुन शिक्रापूर येथे दरोडा ,खून तर दौंड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. शिरूर हद्दीत खून करून काळे हा फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हा चांभुर्डीच्या डोंगर परिसरात राहात असल्याबाबत गुन्हे पथकाला माहिती मिळाल्यावर या पथकाने दोन ते तीन दिवस साध्या वेषात या परिसरात टेहाळणी केली. त्यावेळी काळे हा चांभुर्डीच्या डोंगराळ भागातच वास्तव्यास आहे याची खात्री पटली. त्यानंतर पथकातील पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास आरोपी राहत असलेल्या ठिकाणापासून चार किलोमीटर अलिकडे गाडया लावल्या. तेथून अंधारातच पायी काळेच्या घराकडे प्रस्थान केले. तेथे पोहोचल्यावर त्याच्या झोपडीला चारही बाजुने वेढा घातला. आत जाऊन काळे झोपलेला असताना त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने त्याचे नांव कालिदास असल्याचे सांगितले. वेड्याचे सोंग घेतले. मात्र पथकातील जून्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले. त्याच्या पत्नीला विश्वासात घेतले असता तिने तो काळेच असल्याचे सांगितले. ताब्यात घेतल्यानंतर ' एलसीबीने काळे यांस आज शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिले. काळे हा गेली १२ वर्ष दाढी वाढवून साधूच्या वेषात बीड , कडा , आष्टी, नाशिक , हाजी मलंग आदी भागात राहात होता. यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. मात्र एलसीबीच्या कारवाईमुळे गंभीर गुन्हयातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले. आज त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिल्याचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके याने सांगितले.पोलिस अधीक्षक संदीप पाटील रेकॉर्डवरील फरारी आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.यानुसार या विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश मुंडे, सहाय्यक उपानिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक पोपट गायकवाड , राजू मोमीन, शंकर गम, सुनिल जावळे , शरद , दिपक साबळे , अक्षय नवले , पोलिस मित्र योगेश नवले अन्सार कोरबू यांच्या पथकाने काळे याचा माग काढायचा प्रयत्न सुरू केला . .
.................
गेली १२ वर्ष कालिदास महाराज म्हणून मिरवणारा खूनी दरोड्याचा आरोपी असल्याचा कोणाला संशयही नाही आला. आजच्या अटकेमुळे महाराज म्हणून त्याला ओळखणारे लोक निश्चितच आश्चर्यचकीत होतील.