प्रेयसीच्या मदतीसाठी जाणे तरुणाला पडले भलतेच महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 06:43 AM2023-03-19T06:43:34+5:302023-03-19T06:43:43+5:30
कुलसुम मेत्री (२१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.
मुंबई : लग्नानंतर प्रेयसीच्या मदतीसाठी जाणे तरुणाला भलतेच महागात पडले आहे. प्रेयसीच्या पतीने अनैतिक संबंधाच्या वादातून त्याच्यावर चाकूने वार केले. याप्रकरणी रमेश मेत्री (२०) आणि इम्रान हक ऊर्फ शाहरूख (२३) या दोघांना अटक करण्यात आली असून चुनाभट्टी पोलिस अधिक तपास करीत आहेत. या हल्ल्यात रामकुमार ऊर्फ बाबू गंभीर जखमी झाले आहेत.
कुलसुम मेत्री (२१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे. रामकुमार हा कुलसुम यांच्या बहिणीचा पती आहे. रामकुमार आणि कुलसुम यांच्यात प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध कुलसुमच्या बहिणीला समजल्यानंतर तिने कुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रामकुमारची रवानगी कोठडीत झाली. याच, काळात कुलसुम यांचे त्याच परिसरात राहणाऱ्या रमेशशी प्रेमविवाह झाला.
रामकुमार कारागृहातून सुटून आल्यानंतर पत्नीशी भेटत असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाले. याच, संशयातून १६ तारखेला पत्नीला मारहाण सुरू असताना रामकुमार मदतीसाठी पुढे आला. त्यानंतर, रमेश आणि इम्रान यांनी दोघांना येथील स्वदेशी मिलच्या मेनगेटकडे बोलावून घेतले. तेथे रमेश आणि रामकुमार यांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. रमेशने चाकूने रामवर वार करीत पळ काढला.