ऐकावे ते नवलच! त्यांनी परदेशातून पोस्टाने मागवले लाखोंचे अमली पदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 06:37 AM2023-06-14T06:37:27+5:302023-06-14T06:38:00+5:30
दोघांना अटक; कस्टम विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इंटरनेटवरील डार्क नेटवरून परदेशी पोस्ट सेवेच्या माध्यमातून अमली पदार्थ मागविणाऱ्या मुंबईतील दोन तरुणांना कस्टम विभागाने अटक केली आहे. विशेष म्हणजे, या अमली पदार्थांचे पैसे त्यांनी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून दिले होते. अमली पदार्थांसाठी होणाऱ्या क्रिप्टो करन्सीच्या वापरामुळे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, जोगेश्वरी येथील दोन तरुणांनी इंटरनेटवरील डार्क नेटच्या माध्यमातून नेदरलँड्स येथून ६८ लाख रुपये मूल्याचे अमली पदार्थ दोन टप्प्यांत मागवले होते. यापैकी ३७ लाख रुपयांचे अमली पदार्थांचे पार्सल बॅलार्ड इस्टेट येथील परदेशी पोस्ट सेवेच्या कार्यालयात पोहोचले होते. यामध्ये काहीतरी संशयास्पद माल असल्याचे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. संबंधित पोस्ट सेवेचा कर्मचारी जेव्हा हे पार्सल देण्यासाठी जोगेश्वरी येथे गेला व संबंधित तरुणाने ते पार्सल स्वीकारले, त्यावेळी तातडीने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्यामध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. संबंधित तरुणाचे नाव दानिश शेख असे आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्र समद उमातिया यालाही अटक केली. ज्या पार्सलमधून हे अमली पदार्थ आले होते, त्याची किंमत ३७ लाख रुपये इतकी होती, तर ३१ लाख रुपये मूल्याचे आणखी एक पार्सल अशाच पद्धतीने पोस्टाने येणार असल्याची कबुली त्यांनी कस्टम अधिकाऱ्यांना दिली.
विक्रेता परदेशात
- अमली पदार्थांचा व्यवहार हा क्रिप्टो करन्सीमध्ये झाल्याची माहिती समद याने अधिकाऱ्यांना दिली.
- मालाड येथील एका व्यावसायिकाकडून त्यांनी ही क्रिप्टो करन्सी विकत घेतली होती.
- अधिकाऱ्यांनी जेव्हा समद याचे क्रिप्टो अकाऊंट तपासले तेव्हा त्यांना ते पैसे परदेशातील नेमक्या कोणत्या विक्रेत्याकडे गेले, याची माहिती मिळाली.
- मात्र, तो विक्रेता परदेशात असल्याने अद्याप कारवाई झालेली नाही.