'इट्स रजनी स्टाइल'... धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग करून पोलिसाने पाकिटमाराला पकडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 02:21 PM2018-07-31T14:21:12+5:302018-07-31T14:21:47+5:30
बाबुशा इंगोले या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या लोकलमधून पाकिटमार आरोपीला केली अटक
मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबईच्या लोकलमधून दरदिवशी ७० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. या गर्दीचाच फायदा घेत काही चोरट्यांनी गॅंग या लोकलमध्ये वावरत असते. दररोज शेकडो प्रवाशांची पाकिटं, मोबाईल फोन आणि मौल्यवान ऐवज चोरणारी टोळी सध्या सक्रिय असल्याने आरपीएफ तर्फे 'अँटी पॅसेंजर लगेज थेफ्ट' नावाचे पथक बनविण्यात आले आहे. या पथकातील एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या लोकलमधून पाकिटमार आरोपीला अटक केली आहे.
एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकावर चालत्या लोकलमधून पडलेल्या महिला प्रवाशाला सुद्धा याच अधिकाऱ्याने वाचविले होते. बाबुशा इंगोले हे लष्करातून निवृत्त झालेले आणि काही वर्षांपूर्वी आरपीएफमध्ये रुजू झालेल्या या जवानाच्या साहसाचे कौतुक सध्या केले जात आहे. २४ जुलै रोजी दादर रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एक आरोपी गर्दीत शिरून प्रवाशांचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, आरपीएफ जवान बाबूशा इंगोले यांच्या नजरेतून हा आरोपी सुटला नाही. गर्दीत एका प्रवाशाचे पाकीट मारल्यानंतर हा आरोपी चालत्या लोकलमध्ये घुसला. पण त्याच्या मागे असलेल्या आरपीएफ जवान बाबूशा इंगोले यांनी चालत्या लोकलमध्ये शिरून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी सोबतच्या झटापटीत बाबूशा इंगोले यांचा अपघातही होऊ शकत होता. मात्र, आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावित आरोपीला त्यांनी अटक केली.