जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:28 AM2021-12-23T05:28:33+5:302021-12-23T05:29:36+5:30
जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे. सुकेश चंद्रशेखर याने चित्रपटात भूमिका देण्याची आश्वासने या दोघींना दिली होती. त्याने रॅनबॅक्सीच्या प्रमुखांच्या पत्नीचीही फसवणूक केली होती. त्या दोघी २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरविरुद्ध साक्ष देण्यास तयार झाल्या आहेत.
सुकेशने नोरा फतेहीला महागडी कार तर, जॅकलिन फर्नांडिसला हेलिकॉप्टर दिले होते. त्यांना मोठ्या रकमाही देण्याचे त्याने ठरविले होते. जॅकलिनने हेलिकॉप्टर घेण्यास नकार दिला होता. मात्र नोराने त्याने दिलेली बीएमडब्ल्यू कार स्वीकारली होती.
त्याने दोघींना काही पाळीव प्राणीही दिले होते. ते प्राणी ताब्यात घेणे शक्य नसल्याने ईडीने त्या प्राण्यांच्या किमतीएवढी त्यांची मालमत्ता वा वस्तू ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. या दोघींना सुकेश चंद्रशेखरची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नव्हती, असे त्यांच्या चौकशीतून आढळून आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच त्या साक्षीदार हाेणार आहेत.
सुकेशने आम्हाला दिलेल्या सर्व भेटवस्तू आम्ही ईडीच्या ताब्यात द्यायला तयार आहोत, असे या अभिनेत्रींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीच्या काळात सांगितले आहे. सुकेशप्रमाणे या दोघींना आरोपी का करीत नाही, असे विचारता ईडीचा अधिकारी म्हणाला.
आरोपी नव्हे, बळी
- ईडीने जॅकलिन व नोरा फतेही यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनी आम्हाला सहकार्य केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
- त्या दोघींना ज्या भेटवस्तू सुकेशने दिल्या, त्यासाठीचा पैसा कोठून आला, याची दोघींना माहिती नव्हती, त्यामुळे त्या आरोपी नसून, या प्रकरणातील बळी असल्याचे पोलिसांना चौकशीतून दिसून आले आहे.