२१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन आरोपी; १० कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 08:46 AM2022-08-18T08:46:15+5:302022-08-18T08:50:02+5:30
उपलब्ध माहितीनुसार, सुकेश आणि जॅकलिन यांची घनिष्ठ मैत्री होती.
मुंबई : स्वतःच्या पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळल्याच्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर (वय ३२) याच्यासोबत आता ईडीने या गुन्ह्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिलादेखील आरोपी केले आहे. तिचे नाव बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या खंडणीद्वारे उकळलेल्या पैशांतून १० कोटींच्या भेटवस्तू चंद्रशेखर याने जॅकलिनला दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशात जॅकलिनदेखील वाटेकरी असल्याचा ठपका ईडीने तिच्यावर ठेवला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुकेश आणि जॅकलिन यांची घनिष्ठ मैत्री होती. त्याच्या अनेक गुन्ह्यांची जॅकलिन हिला माहिती होती. वेळोवेळी ती सुकेश याच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारेही संपर्कात होती. सुकेशने त्याच्या उद्योजक पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळल्याचेही प्रकरण पुढे आले होते. याच पैशांतून सुकेश याने जॅकलिन हिला सुमारे १० कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले. तसेच सुकेशने या खंडणीच्या पैशांतून आपल्याला भेटवस्तू दिल्या आहेत, याचीदेखील माहिती जॅकलिन हिला होती, असा ठपका ईडीने तिच्यावर ठेवला आहे.
जॅकलिनला मिळालेल्या भेटवस्तू कोणत्या ?
- क मिनी कूपर गाडी
- हिऱ्याची कानातली १५ आभूषणे
- नऊ लाख किमतीच्या तीन मांजरी
- ५२ लाख किमतीचा घोडा
- अनेक महागड्या ब्रँडच्या बॅगा, जिमचे कपडे
- रोलेक्स ब्रँडची अनेक घड्याळे
- जॅकलिनच्या बहिणीला दीड लाख अमेरिकी डॉलर कर्जरूपाने, तसेच एक बीएमडब्ल्यू गाडी
- ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जॅकलिनच्या भावाला १५ लाख कर्जरूपाने दिले.
आतापर्यंत ३२ गुन्ह्यांची नोंद
सुकेशने जॅकलिनला भेटवस्तू दिल्याचा कबुलीजबाब ईडीच्या चौकशीत दिला होता. यापैकी जॅकलिन हिच्याकडून सात कोटींची संपत्ती (भेटवस्तूंसह) ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉण्ड्रिंग कायद्यांतर्गत यापूर्वीच जप्त केली आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा जॅकलिनची चौकशी केली आहे. आतापर्यंत सुकेशवर अनेक राज्यांतील पोलिसांबरोबरच ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागातर्फे एकूण ३२ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४ एप्रिलला त्याला ईडीने अटक केली आहे. स्वतःच्या पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळण्यासोबतच, सुकेशने तो पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, विधी मंत्रालयातील मोठा अधिकारी असल्याचे भासवत अनेकांना गंडा घातला आहे.