जगदीप थोरात खूनप्रकरणी वीस जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:04 AM2021-03-13T01:04:47+5:302021-03-13T01:04:53+5:30
माजी आमदार प्रभाकर घार्गेंचा समावेश; आरोपींपैकी सहा जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : वडूज (जि.सातारा) : पडळ (ता. खटाव ) येथील खटाव-माण ॲग्रो प्रोसेस या साखर कारखान्यात कार्यरत असणारे प्रोसेसिंग मुख्य अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय ४०, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, त्यांचे बंधू संग्राम घोरपडे आदी २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील सहा जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनोज भीमराव घोरपडे, संग्राम भीमराव घोरपडे, सनी दयानंद क्षीरसागर, रणजित धनाजी सूर्यवंशी, शुभम राजेंद्र घाडगे, रोहित रामदास कोलुगडे यांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील संशयित सहा जणांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पडळ येथील खटाव-माण ॲग्रो प्रोसेस या साखर कारखान्यात प्रोसेसिंग मुख्य अधिकारी म्हणून जगदीप थोरात हे काम करत होते. जगदीप थोरात यांनी कारखान्यात नोकरी करत असताना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून कारखान्याचे संचालक मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, प्रभाकर घार्गे, महेश घार्गे, सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे, शेडगे मामा व अनोळखी १० ते १२ जणांनी फायबर काठी, ऊस, सळी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हा प्रकार दि.१० मार्चला सायंकाळी घडला होता. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाल्याने त्यांना कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना थोरात यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यानंतर थोरात कुटुंबीयांनी संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी केली. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत कुटुंबीयांचे जाबजबाबही पोलिसांनी घेतले. दरम्यान, थोरात यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याने कऱ्हाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.