'जय सोफिया' या तरंगत्या हॉटेलचा परवाना रद्द ; वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:01 PM2019-01-03T14:01:19+5:302019-01-03T14:02:44+5:30
वांद्रे पोलिसांनी या हॉटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल आणि व्हाईट फॉक्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मनोज मुलचंदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भा दं स कलम 286 आणि 336 अन्वये निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ बाळगून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा आरोप आहे.
मुंबई - ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान तरंगत्या हॉटलवर फटाके फोडणं महागात पडले आहे. फटाके फोडून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली केल्याने ‘जय सोफिया’ या तरंगत्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई मेरीटाईम बोर्डाने या प्रकरणी मुंबईतील वांद्रे येथील समुद्रात उभारलेल्या ‘जय सोफिया’ या हॉटेलचा परवाना देखील दोन दिवसांसाठी रद्द केला आहे. तसेच वांद्रे पोलिसांनी या हॉटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल आणि व्हाईट फॉक्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मनोज मुलचंदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भा दं स कलम 286 आणि 336 अन्वये निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ बाळगून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा आरोप आहे.
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी वांद्रे समुद्रात असलेल्या जय सोफिया या तरंगत्या हॉटेलवर फटाक्यांच्या आतषबाजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेत वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई मेरीटाईम बोर्डाने या प्रकरणी संबंधीत हॉटेलकडून स्पष्टीकरण मागवत दोन दिवसांसाठी हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आल्याचे एमएमबीचे अधिकारी विक्रम कुमार यांनी म्हटले आहे. कुमार यांनी या प्रकरणी तरंगत्या हॉटेलच्या मालकाविरूद्ध कारवाई करण्याबाबत डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांना पत्र देखील लिहिले आहे. दरम्यान, हॉटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल यांनी कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जगभरात जवळपास सर्वच तरंगत्या हॉटेलवर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. तसेच आमच्याकडे आग प्रतिबंधक यंत्रणा देखील आहे. आम्ही मुंबई मेरीटाईम बोर्डाकडे आमची बाजू मांडून देखील परवाना रद्द केल्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे अगरवाल यांनी म्हटले आहे.