रोज एक चोरी, ३० हजार पगार; चोरांची कॉर्पोरेट कंपनी पाहून पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:22 PM2022-03-12T20:22:24+5:302022-03-12T20:22:43+5:30
पोलिसांकडून १० जणांना अटक; चोरांची कॉर्पोरेट कंपनी पाहून पोलिसांना धक्का
जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पोलिसांनी चोरांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख प्रत्येक सदस्याला दररोज एक टार्गेट द्यायचा. दिवसाला एक चोरी, महिन्याला ३० हजार पगार असं कामाचं स्वरुप होतं. विशेष म्हणजे टार्गेट पूर्ण केल्यावर टोळीतील सदस्याला कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे इंसेंटिव्ह दिलं जायचं.
चोरांची टोळ्या जुनी वाहनं चोरायची. वाहनं चोरायची, त्यांचे पार्ट्स कापून विकायचे, उरलेल्या सामानाची विल्हेवाट लावायची, अशी कामं ही टोळी करायची. पोलिसांनी १० जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून बाईक, स्कूटी, ई-रिक्षासह अनेक वाहनं जप्त करण्यात आली. या टोळक्यानं आतापर्यंत कोट्यवधींची वाहनं भंगारात विकल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अटक करण्यात आलेले सगळे आरोपी वाहनाच्या चोरीपासून त्याचे पार्ट्स वेगळे करून भंगारात विकण्यापर्यंतची सगळी कामं करायचे. ही टोळी आधी वाहनांची रेकी करायची. त्यानंतर संधी मिळताच वाहनं चोरून पसार व्हायची. टोळीचा म्होरक्या त्यावेळी घटनास्थळी हजर असायचा. वाहन चोरल्यानंतर ते गुप्त ठिकाणी नेलं जायचं. तिथे वाहनाचे पार्ट्स वेगळे केले जायचे. ते वेगवेगळ्या ठिकाणी विकण्यात यायचे.
टोळीतील सगळ्या सदस्यांना पगार मिळायचा. दिवसाला हजार रुपये दिले जायचे. दर दिवशी एक वाहन चोरण्याचं टार्गेट होतं. अशा प्रकारे टोळीच्या म्होरक्यानं अनेक तरुणांना आपल्यासोबत घेतलं. या प्रकरणी लवकरच आणखी काही जणांना अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.