सव्वा लाखाची लाच घेताना प्रांताधिकाऱ्यासह लिपिक जाळ्यात, जळगाव एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:16 PM2020-08-21T16:16:32+5:302020-08-21T16:23:51+5:30
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिज कर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना आहे,असे असताना वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार यांच्या पथकाने पकडून ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला लावण्यात आले होते.
जळगाव - तहसीलदारांच्या पथकाने पकडलेले वाळूचे दोन ट्रक सोडण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे (वय 36, रा.रामेश्ववर शासकीय निवासस्थान, सागर पार्क समोर, जळगाव) व त्यांचा लिपिक अतुल अरुण सानप (वय 32,रा. महाजन नगर, मेहरुण) या दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहात पकडले.दोघांना अटक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ही कारवाई झाली.
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिज कर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडील परवाना आहे,असे असताना वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार यांच्या पथकाने पकडून ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला लावण्यात आले होते. हे ट्रक सोडण्यासाठी तक्रार यांनी प्रांताधिकारी चौरे यांची गुरुवारी भेट घेतली असता लिपिक अतुल सानप यांनी प्रांताधिकारी यांच्यासमक्ष दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले.त्यानंतर तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सापळा
या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सापळा लावण्यात आला. लिपिक अतुल सानप यांच्या पंटरने सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारली असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक जी.एम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव,हवालदार अशोक आहिरे,मनोज जोशी,सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांनी केली. दरम्यान प्रांताधिकारी व लिपिक या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.