‘ए निकाल तेरे पास क्या है’; उद्योजकाच्या पोटाला चाकू लावून लुटला चार लाखांचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 04:25 PM2020-11-03T16:25:43+5:302020-11-03T16:26:38+5:30
ही घटना सोमवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास कानळदा रस्त्यावरील तुरखेडा शिवारात घडली. याप्रकरणी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon, robbery)
जळगाव : संध्याकाळी शेत रस्त्याने फिरायला गेलेल्या महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडोरे (६४, रा.नवी पेठ, जळगाव) या उद्योजकाला शेतातील पिकात दबा धरुन बसलेल्या दोघांनी पोटाला चाकू लावून लुटल्याची घटना घडली आहे. लुटारुंनी त्यांच्या खिशातील ८० हजार रुपये रोख आणि दागिने, असा ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास कानळदा रस्त्यावरील तुरखेडा शिवारात घडली. याप्रकरणी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रकुमार मंडोरे यांची तालुक्यातील कानळदा रसत्यावरील तुरखेडा शिवारात इंदूमोती टेक्स फॅब प्रा. लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीत १२५ मजूर कामाला आहेत. मंडोरे या कंपनीच्या परिसरातील शेत शिवारात रोज संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास जातात. त्याचप्रमाणे सोमवारही ते संध्याकाळी साडे सहा वाजता कानळदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडीच कि. मी.पर्यंत वीर मुंजेच्या मंदिरापर्यंत फिरत गेले. तेथून परत कंपनीकडे येत असताना कापसाच्या शेतात दबा धरून बसलेले दोन जण तोंडाला रुमाल आणि कापडी लखोटे बांधून मंडोरे यांच्याजवळ आले. त्यातील एकाने पोटाला चाकू लावला व दुसऱ्याने हिंदीतून ‘ए निकाल तेरे पास क्या है’असे म्हणाला.
यानंतर या दोघांनी उजव्या हातावर असलेले १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचे ६३ ग्रॅमचे ब्रासलेट काढले, त्यानंतर १ लाख ३७ हजार रुपये किमतीची ५५ ग्रॅमची सोन्याची साखळी काढली व नंतर उजव्या हातातील ३७ हजार ५०० रुपये किमतीची १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढल्यानंतर खिशातील ८० हजाराची रोकड हिसकावली.