Terrorist Attack: श्रीनगरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; आज गैर काश्मीरी पाणीपुरीवाला, मेस्त्रीची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 08:13 PM2021-10-16T20:13:13+5:302021-10-16T20:16:21+5:30
Terrorist Attack on Civilians: प्रत्येक नागरिकाला वैयक्तीक सुरक्षा देणे अशक्य असल्याचे मत आज सैन्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला LeT चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी उमर मुश्ताक खांडे आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.
जम्मू काश्मीरमध्ये (jammu and kashmir) दहशतवाद्यांनी (terrorist) गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आज दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या ईदगाह भागात एका व्यक्तीला गोळी मारली. तो बिहारचा नागरिक होता. तिथे पाणी पुरीचा व्य़वसाय करत होता. तर आणखी एका घटनेत पुलवामामध्ये मुळच्या उत्तर प्रदेशच्या मेस्त्रीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
अरविंद कुमार साह असे बिहारच्या पाणीपुरीवाल्याचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर गोळी मारण्यात आली. स्थानिक लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्यात गोळी मारल्याने रक्तस्त्राव जास्त झाला, यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Terrorists fired upon 2 non-local labourers in Srinagar & Pulwama. Arvind Kumar Sah of Banka, Bihar succumbed to injuries in Srinagar and Sagir Ahmad of UP critically injured in Pulwama. Areas have been cordoned & searches started: Kashmir Zone Police pic.twitter.com/q4NKriIW7e
— ANI (@ANI) October 16, 2021
दुसरा हल्ला युपीच्या सागिर अहमदवर करण्यात आला. तो कारपेंटर होता. या दोन्ही हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी हे भाग घेरले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. प्रत्येक नागरिकाला वैयक्तीक सुरक्षा देणे अशक्य असल्याचे मत आज सैन्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला LeT चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी उमर मुश्ताक खांडे आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. पुलवामाच्या (Pulwama) पंपोरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी उमर मुश्ताक खांडे याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.