स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:00 AM2024-10-02T11:00:31+5:302024-10-02T11:41:20+5:30
दोन लाख रुपये देऊन आयपीएस बनलेल्या मिथिलेश कुमारच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
बिहारच्या जमुई जिल्ह्यात ११ दिवसांच्या तपासानंतर दोन लाख रुपये देऊन आयपीएस बनलेल्या मिथिलेश कुमारच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मिथिलेश कुमारला २० सप्टेंबर रोजी पकडण्यात आलं होतं. आता तो कलाकार म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, मिथिलेशने पोलीस आणि मीडियाला दिलेली सर्व विधानं बनावट आणि खोटी होती, ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात.
जमुईचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी सांगितलं की, २० सप्टेंबर रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात बनावट आयपीएस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील तपासात मिथिलेश कुमारने मनोज सिंहने २ लाख रुपयांची फसवणूक करून बनावट आयपीएस बनवण्यास सांगितल्याचं म्हटलं होतं. पण मनोज सिंह नावाच्या व्यक्तीला समोर आल्यानंतर मिथिलेशने व्यक्तीला ओळखण्यास नकार दिला आहे.
ज्या दिवशी मिथिलेश कुमारने मनोज सिंहला पैसे देऊन बनावट आयपीएस बनण्यासाठी गणवेश खरेदी करण्यास सांगितलं होतं, तेव्हा मिथिलेश कुमारचं मोबाइल लोकेशन खैरा येथे नसून लखीसराय येथे होते. मिथिलेशने आपल्या मामाकडून दोन लाख रुपये घेतल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, परंतु पोलीस मिथिलेशच्या मामाशी बोलले असता, त्यांनी एकरकमी दोन लाख रुपये देण्यास नकार दिला.
चौकशीदरम्यान मिथिलेशने मनोज सिंहचे दोन मोबाईल नंबर पोलिसांना दिले आणि या नंबरवरून तो मनोजशी बोलत असे, असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तपास केला असता दोन्ही क्रमांक इनएक्टिव्ह आढळले. दोन लाख रुपये देऊन बनावट आयपीएस केल्याचं सिद्ध होऊ शकेल अशी कोणतीही बाब पोलिसांच्या तपासात सापडली नाही. मिथिलेशने सांगितलेल्या गोष्टी वस्तुस्थितीच्या पलीकडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
एसडीपीओ सतीश सुमन यांनी सांगितलं की, मिथिलेशने जो आयपीएस गणवेश परिधान केला होता त्याचं माप त्यानेच दिलं होतं आणि गणवेशही त्यानेच शिवला होता. मिथिलेश कुमारने सोशल मीडियावर व्हायरल आयपीएस मिथिलेशच्या नावाने अकाउंट बनवले आहे. दररोज तो एक नवीन ब्लॉग तयार करतो आणि तो पोस्ट करतो, जो लोक पहात आहेत. सोशल मीडियावर तो खूप चर्चेत आहे.