एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त
By Appasaheb.patil | Published: November 18, 2022 06:47 PM2022-11-18T18:47:10+5:302022-11-18T18:48:04+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण व विभागीय उपायुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांचे आदेशान्वये व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांचे नेतृत्वात जिल्हाभरात अवैध हातभट्टी दारु विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ११४० लिटर हातभट्टी दारु, ६९०० लिटर रसायन, १ जीप व १ कार असा एकूण ६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक माळशिरस यांच्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अकलूज शहरातील राऊतनगर येथे बाबू खंडू राठोड, (वय ४२ वर्षे रा. वडजी तांडा, ता दक्षिण सोलापूर) हा त्याच्या चारचाकी पिकअप वाहनातून तीन रबरी ट्यूबमध्ये ४ लीटर हातभट्टी दारु अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देश्याने वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याला अटक करुन त्याच्या ताब्यातून वाहनासह एकूण रुपये ४ लाख १५ हजार ९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक, अकलूज यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील येळीव गावाच्या हद्दीत एका मारुती कारचा पाठलाग करुन झडती घेतली असता रमेश गोपीचंद राठोड (वय ३८ वर्षे, रा. वडजी तांडा, ता दक्षिण सोलापूर) हा इसम ३०० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना दिसून आल्याने त्याला अटक करुन त्याच्या ताब्यातून वाहनासह १ लाख १५ हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई निरिक्षक माळशिरस संदिप कदम, दुय्यम निरिक्षक अकलूज राजेंद्र वाकडे, जवान तानाजी जाधव व अशोक माळी यांच्या पथकाने केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर पथकाने मुळेगाव तांडा, वडजी तांडा, बक्षीहिप्परगा तांडा, वरळेगाव तांडा याठिकाणी छापे मारून हातभट्टी निर्मितीकरिता लागणारे ३२०० लिटर गुळमिश्रीत रसायन जप्त करुन नष्ट करण्यात आले. तसेच सेवा तांडा ता. दक्षिण सोलापूर याठिकाणी रेणुका गुरुदेव राठोड या महिलेच्या राहत्या घरातून रबरी ट्यूब मध्ये साठवलेली ५४० लिटर हातभट्टी दारु जप्त केली असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुळवंची तांडा ता. उत्तर सोलापूर येथील गोशाळेच्या पाठीमागे छापे टाकून ३७०० लिटर गूळमिश्रित रसायन जप्त करुन ८३००० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या ठिकाणाहून फरार झालेल्या आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.