ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना
By अझहर शेख | Published: May 5, 2024 11:38 PM2024-05-05T23:38:14+5:302024-05-05T23:38:52+5:30
या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे.
अझहर शेख, नाशिक: ICICI होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापुरनाका शाखेतील सेफ्टी लॉकर किल्लीने उघडून दोघा अज्ञात इसमांनी सुमारे ४ कोटी ९२ लाख रूपये किंमतीचे सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने लांबिवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी फायनान्स कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या जुना गंगापुर नाका परिसरात प्रमोद महाजन उद्यानाला लागून असलेल्या इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीचे कार्यालय वरील मजल्यावर आहे. या कार्यालयात असलेल्या सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे २२२ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. शनिवारी (दि.४) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शाखा व्यवस्थापक चंद्रकांत मुठेकर यांनी कार्यालय उघडून नियमितपणे कामकाजाला सुरूवात केली.
गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे कंपनीमध्ये काम करत असताना संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले.
यावेळी त्यांच्याकडे असलेल्या एक किल्ली व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर यांच्याकडे असलेली दुसरी किल्लीने लॉकर उघडले. यावेळी हे लॉकर पुर्णपणे रिकामे असल्याचे त्यांना दिसताच पायाखालची वाळू सरकली. जाधव यांनी त्वरित क्रेडिट व्यवस्थापक रणजित देशमुख यांना माहिती कळविली. देशमुख यांनी प्रशासकीय व्यवस्थापक फिर्यादी जयेश कृष्णदास गुजराथी (३४,रा.पाथर्डीफाटा) यांना माहिती कळविली. त्यांनी कार्यालयात धाव घेत पाहणी केली असता लॉकर रिकामे असल्याचे दिसून आले. त्यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ICICI HFC ने या चोरीच्या घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. तपास यंत्रणेकडून होत असलेल्या तपासात ICICI HFC पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देत आहे, असे स्टेटमेंट व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आले आहे.