२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:47 PM2024-10-10T15:47:32+5:302024-10-10T15:56:53+5:30
मंत्र्यांच्या घरात २० वर्षांपासून असलेल्या नोकराने तब्बल ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंह यांच्या घरात चोरी झाली आहे. मंत्र्यांच्या घरात २० वर्षांपासून असलेल्या नोकराने तब्बल ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. आता मंत्र्याच्या मुलाने नोकरांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत २४ तासांत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित दागिने जप्त करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत.
रघुराज सिंह यांच्या घरातून फेब्रुवारी महिन्यात लाखोंचे दागिने चोरीला गेले होते. त्यावेळी मंत्र्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली होती आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. नंतर पत्नीचा मृत्यू झाला. मात्र याच दरम्यान कुटुंबातील सर्व सदस्य दिल्लीतच उपचार आणि हॉस्पिटलमध्ये व्यस्त होते.
मंत्री रघुराज सिंह यांचा मुलगा निशू ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा २० वर्षे जुना नोकर सोनू, सागर आणि त्यांची आई या घरात राहत होते. घरातून दागिने चोरीला गेल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. त्यानंतर माहिती मिळाली की, त्यांच्या नोकराने चोरी केली होती. त्यावरून पोलिसांनी चौघांना अटक केली.
या घटनेवर मंत्री रघुराज सिंह म्हणाले की, घरात काही मौल्यवान वस्तू होत्या, ज्या पूर्वजांकडून मिळाल्या होत्या, त्यामध्ये जवळपास अर्धा किलो सोने आणि ५-६ किलो चांदी असू शकते. माझी पत्नी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाली तेव्हा मी आणि माझी दोन मुलं तिच्यासोबत होतो. त्याच काळात जुन्या नोकराने चोरी केली. असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. आम्ही त्यावेळी कोणाला सांगितलं नाही कारण आम्हाला आमच्या पत्नीच्या निधनाचं खूप दुःख होतं. त्यातच तीन-चार महिने निघून गेले.
आरके सिसोदिया म्हणाले की, बन्ना देवी पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये मंत्र्यांच्या घरातून सुमारे ५० लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती मिळाली होती, ज्यात सोन्या-चांदीचे दागिने होते. चोरावर संशय बळावला. माहितीच्या आधारे योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करून चोरीच्या मालासह चार आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित वस्तू परत मिळविण्यासाठी तीन पथकं प्रयत्न करत आहेत. कायदेशीर कारवाई केली जाईल.