घरात घुसून दागिने, रोकड लंपास; चोरटयांच्या हल्ल्यात मायलेकी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 10:02 PM2022-02-07T22:02:07+5:302022-02-07T22:03:33+5:30
ROBBERY CASE : याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण - घरफोडी वाहनचोरी आणि रस्त्यावर लुटमारीचे प्रकार सातत्याने घडत असताना येथील अटाळी गावातील एका घरात घुसून दोघा चोरटयांनी वृध्द महिला आणि तिच्या विवाहित मुलीवर हल्ला करीत दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री मध्यरात्री घडली. दोघीजणी जखमी झाल्या असून त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अटाळी मानी गावात राहणा-या वत्सला चिकणे यांच्या शेजा-याने माघी गणेशाची स्थापना केली होती. त्यानिमित्ताने वत्सला यांची मुलगी सारिका चव्हाण ही देखील तीच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी आली होती. रविवारी मध्यरात्री वत्सला आणि सारिका व तिची मुले घरात झोपले असताना त्यांच्या घरात दोन चोरटे घुसले. दरम्यान त्याचवेळेला वत्सला यांना जाग आल्याने त्या उठल्या. चोरटे त्यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी वत्सला यांच्या डोक्यावर चोरटय़ांनी कोणत्यातरी वस्तूने प्रहार केला.
यावेळी झालेल्या आवाजाने मुलगी सारीका ही देखील जागी झाली. सारीकाने चोरटय़ांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटयांनी तीला ही मारहाण केली. चोरटयांच्या हल्ल्यात दोघी जखमी झाल्या. चोरटयांनी घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पोबारा केला. मायलेकींवर डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चोरटयांच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.