लग्न मांडवातून लांबवले दागिने, आहेराची पाकिटे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:00 AM2019-05-10T02:00:40+5:302019-05-10T02:01:11+5:30
भार्इंदरमधील एका लग्नाच्या हॉलमध्ये शिरुन दोघा चोरट्यांनी नवरी मुलीला आलेल्या आहेराची पिशवीच स्वागत समारंभावेळी पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
मीरा रोड - भार्इंदरमधील एका लग्नाच्या हॉलमध्ये शिरुन दोघा चोरट्यांनी नवरी मुलीला आलेल्या आहेराची पिशवीच स्वागत समारंभावेळी पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या लग्न सराईचे दिवस असून, लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे सक्रिय झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
नरीमन पॉर्इंट येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करणारे नरसिंग परदेशी हे भार्इंदर पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (६० फुटी ) मार्गावर कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी प्रियांका (२७) हिचे लग्न ३० एप्रिल रोजी रात्री १५० फुटांवरील व्यंकटेश हॉलमध्ये होते. नरसिंग हे समारंभास येणाऱ्या पाहुण्यांनी आणलेल्या भेटवस्तू, पाकिटे ही बाजूच्या सोफ्यावर बसलेल्या पत्नी जयश्रीकडे देत होते. पाकिटे व लहान भेटवस्तू त्या एका पिशवीत ठेवत होत्या. रात्री १०.१५च्या सुमारास त्या पिशवी सोफ्यावर ठेवून उठल्या. पुन्हा सोफ्यावर बसण्यास आल्या असता आहेराची पिशवीच गहाळ झाली होती. हॉलमध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता, त्यात दोघे अनोळखी दिसून आले. त्यातील एकाने सोफ्यावरील आहेराची पिशवी चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले. आहेराची सुमारे २५ ते ३० बंद पाकिटे, आणि दागिने मिळून ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.