रुग्णालयातून पळविले कोरोनाग्रस्ताच्या मुलाचे दागिने, पैसे; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:35 AM2020-10-12T02:35:10+5:302020-10-12T02:35:23+5:30
आसिफ इद्रीस पठाण (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचा ३० हून अधिक गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले.
मुंबई : मालाडच्या नामांकित रुग्णालयातून वृद्ध कोरोना रुग्णाच्या मुलाचे ८० हजार रुपये, तसेच दागिने पळवण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपासाअंती आरोपीला अटक केली.
आसिफ इद्रीस पठाण (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचा ३० हून अधिक गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले. यातील १६ गुन्ह्यांत त्याला शिक्षाही झाली. तक्रारदाराच्या वडिलांना कोरोना झाल्यामुळे ४ आॅक्टोबरला त्यांना मालाड पूर्वेकडील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८० हजार रुपयांसह मोबाइल, आणि कागदपत्रे एका बॅगत ठेवून तक्रारदार मुलगा रात्री रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात झोपला. त्याच दरम्यान त्यांची बॅग पळवण्यात आली. शोधाशोध करूनही ती न सापडल्याने अखेर मुलाने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, तपास अधिकारी सचिन गवस, अतुल डहाके विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, आशिष शेळके हरीश पोळ, हेमंत गीते आणि अंमलदार यांनी या प्रकरणी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद व्यक्ती बाहेर जाताना, तसेच पुढे एका रिक्षात बसल्याचे निदर्शनास आले. पथकाने घटनास्थळ ते अंधेरी दरम्यानचे १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यातूनच मिळालेल्या अर्धवट रिक्षाच्या क्रमांकावरून ते पठाणपर्यंत पोहोचले. त्याला अंधेरीतून ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा गोरेगाव येथून आणि दुसरी मालाडमधून चोरी केल्याचे सांगितले. दोन्हीही रिक्षा, तसेच ५ मोबाइल जप्त केले असून पठाणला दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
असे आहेत दाखल गुन्हे
पठाण विरुद्ध जबरी चोरीचे २, मोटर वाहन चोरीचे ९, घरफोडी २, प्रतिबंधक कारवाई २, पोलिसांच्या ताब्यातून पळ १, इतरे १४ अशा प्रकारे मुंबईत ३० हून अधिक गुन्हे नोंद आहेत. यापैकी १४ गुन्ह्यांमध्ये त्याने शिक्षा भोगलेली आहे.