शहरात रिक्षा प्रवासात दागिने पळविणारी महिलांची टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:15 PM2019-09-28T13:15:24+5:302019-09-28T13:19:47+5:30
महिलांना बोलण्यात व्यस्त केल्यानंतर पैसे पळवीत
औरंगाबाद : रिक्षा प्रवासात सहप्रवाशांची नजर चुकवून किमती ऐवज पळविणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. अटकेतील आरोपी महिलांनी २७ आॅगस्ट रोजी जालाननगर येथील एका महिलेचे १ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने रिक्षा प्रवासात चोरल्याची कबुली दिली. वेदांतनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद आहे.
दीपा रघू गाजवारे (२५), संगीता राम गाजवारे (२०) आणि यलम्मा कुमर गाजवारे (४३, रा. सर्व रा. गंगापूर झोपडपट्टी) अशी अटकेतील संशयित महिलांची नावे आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगर येथे राहणाऱ्या सत्यशीला सोपानराव सदाफुले (५२, रा. लाभगार्डन अपार्टमेंट, जालाननगर) या २७ सप्टेंबर रोजी बीड येथून मुलाला भेटून सिडको बसस्थानक येथून रेल्वेस्टेशन येथे रिक्षाने आले. यानंतर त्या स्टेशन येथील पेट्रोलपंप येथून घरी जालाननगर येथे जाण्यासाठी दुसऱ्या रिक्षाचालकाशी (एमएच-२० बीटी-६६१०) बोलत असताना महिला, सोबत मुले आणि अन्य एक महिला रिक्षात बसलेल्या होत्या. यानंतर सत्यशीला यांनी त्यांची पिशवी रिक्षात ठेवली आणि त्या रिक्षाने जालाननगर येथे गेल्या होत्या. यावेळी रिक्षातून उतरून त्या घरी गेल्या आणि तेथे त्यांनी त्यांची पिशवी तपासली असता सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ६ हजार ६६ रुपये किमतीचा ऐवज गायब असल्याचे समजले. हे दागिने रिक्षातील त्या तीन महिलांनी पळविल्याची तक्रार सत्यशीला यांनी वेदांतनगर ठाण्यात नोंदविली होती.
रिक्षा प्रवासात सहप्रवाशांच्या पिशवीतील किमती ऐवज चोरणाऱ्या महिला वाळूज रोडवरील ए.एस. क्लबजवळ उभ्या असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. पोलीस उपायुक्त मीना मकवाणा, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, कर्मचारी सय्यद मुजीब अली, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, आनंद वाहूळ, राहुल खरात, रोहिणी चिंचोळकर, सरिता भोपळे, आशा कुटे-देशमुख आणि चालक दादासाहेब झारगड यांनी वाळूज रोडवर जाऊन लगेच संशयित महिलांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सत्यशीला सदाफुले यांचे दागिने चोरल्याची कबुली दिली.
अनेक गुन्हे केल्याचा संशय
अटकेतील संशयित आरोपी महिला बसस्थानक परिसर, रेल्वेस्टेशन आदी ठिकाणी सहप्रवासी म्हणून रिक्षात बसून गर्दी करीत आणि शेजारी बसलेल्या महिलेस बोलण्यात व्यग्र करून त्यांच्या बॅगची चेन उघडून त्यातील किमती ऐवज चोरून नेत. अशा प्रकारे त्यांनी अनेक गुन्हे केले असावेत, असा संशय गुन्हे शाखेला आहे.