बोलण्यात गुंतवून पळवायची दागिने, खोटे मणी देऊन रिंगा पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 12:21 PM2023-04-08T12:21:23+5:302023-04-08T12:21:43+5:30
दागिने लंपास करणाऱ्या महिलेला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बोलण्यात गुंतवून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक झालेल्या महिलेनेच तिला ओळखल्याने संबंधित आरोपीची ओळख पटली तर तिची साथीदार अद्याप पसार असून तिचा शोध सुरू आहे.
आरोपी महिलेचे नाव वनिता साहेबराव मानधरे (४०) असे असून ती नवी मुंबईच्या सानपाडा येथे राहाते. तक्रारदार अभिसरा सिंग (३८) या २९ मार्च रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्या लिफ्टजवळ असताना मानधरे ही तिच्या ३९ वर्षीय साथीदार महिलेसोबत सिंग यांच्याजवळ आली. मानधने सिंग यांना माझा नवरा इथे नालेसफाईचे काम करतो, तुम्ही त्याला ओळखता का, असे विचारले. सिंग यांनी नकार दिल्यावर मानधरेने तिच्याकडील सोनेरी रंग सदृश्यमणी दाखवत ते मला ट्रेनमध्ये मिळाले. हे मणी तू घे आणि मला तुझ्या कानातील रिंग दे, असे सांगितले.
बोलण्याच्या नादात त्यांच्या कानातील रिंग काढून घेत मणी सिंग यांना देत दोघी निघून गेल्या. घरी आल्यावर मणी खोटे असल्याचे कळले तेव्हा हनी सिंग यांना धक्का बसला. मात्र ५ एप्रिल रोजी सिंग त्यांच्या पतीसह तक्षशिला परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या त्यावेळी मानधरे अन्य एका महिलेला बोलण्यात गुंतवत असल्याचे त्यांनी पाहिले. ती महिला जोरात ओरडल्याने सिंग व अन्य लोक त्यांच्या दिशेने गेले आणि तिची ओळख पटली. सर्वांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्या साथीदाराची ओळख पटवू शकते, असे सिंग यांनी सांगितल्याने पोलिस तिचा शोध घेत आहेत.