तृतीयपंथीचे लाखोंचे दागिने पोलिसांनी केले परत; चोरीचे २० मोबाईलही दिले नागरिकांना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:53 PM2022-10-06T17:53:19+5:302022-10-06T17:56:23+5:30
५५ वर्षीय तृतीयपंथीयाला एक एप्रिलच्या दुपारी गळ्याला साडी बांधून, तोंडात साडी कोंबून, मारहाण करत पलंगाला बांधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरीने चोरी करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती.
मंगेश कराळे, नालासोपारा :-
५५ वर्षीय तृतीयपंथीयाला एक एप्रिलच्या दुपारी गळ्याला साडी बांधून, तोंडात साडी कोंबून, मारहाण करत पलंगाला बांधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरीने चोरी करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. यातील आरोपीला अटक करून गुन्ह्यातील ९८ टक्के हस्तगत मुद्देमाल तुळींज पोलिसांनी पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी एका कार्यक्रमात तृतीयपंथीयाला परत केले आहे. तसेच चोरीचे २० मोबाईलही नागरिकांना परत करण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल तुळींजचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
ओम नगरच्या बेस्ट अपार्टमेंटमध्ये तृतीयपंथी अब्दुल राईन (५५) राहतो. एक एप्रिलला दुपारी तीन वाजता घरी झोपलेल्या असताना आरोपी आयानने घरात येऊन अब्दुल यांच्या गळ्याला साडीने गुंडाळले होते. त्यावेळी त्यांना जाग आल्यावर आरोपीने त्यांच्या तोंडामध्ये साडी कोंबली होती. तेव्हा त्यांनी प्रतिकार केल्यावर आरोपीने त्यांच्या हाताला दाताने चावा घेतला होता. त्यानंतर गळ्याला साडीने गुंडाळून त्याच साडीने पलंगाला बांधून पर्समध्ये ठेवलेले ९ लाख १७ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे जबरीने चोरून आरोपी पळून गेला होता. तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी आरोपी आयान शेख (२१) याला अटक केली होती. त्याच्याकडून ९८ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. वसई न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातील छोटेखानी कार्यक्रमात अब्दुल राईन यांना ७ लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिने, ८८ हजार ५०० रुपयांचा रोख धनादेश देण्यात आला आहे. तर दीड लाख रुपये किंमतीचे चोरी केलेले २० मोबाईल प्रत्येक मोबाईल धारकांना परत केले आहे. चोरी झालेला मुद्देमाल परत मिळाल्याने अब्दुल राईन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्यासह तुळींज पोलिसांचे आभार मानले आहे.