रेल्वे तिकीटाच्या रांगेत उभा होता तरुण, चोरट्यांनी चेहऱ्यावर भाजी फेकली अन् सोन्याची चेन खेचून पळाले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 06:58 PM2022-10-22T18:58:00+5:302022-10-22T18:59:12+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यातच सोनसाखळी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत.
नवी दिल्ली-
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यातच सोनसाखळी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या झाशी रेल्वे स्थानकात मध्य प्रदेशातील एक प्रवासी अशाच एका सोनसाखळी चोरीचा शिकार बनला आहे.
तरुण जबलपुरला जाण्यासाठी झाशीच्या रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा होता. यातच काही चोरट्यांनी त्याच्या चेहऱ्यावर भाजी फेकली. गडबडलेल्या तरुणानं चेहऱ्यावरील भाजी बाजूला सारणार इतक्यातच चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली आणि पळ काढला.
पीडित युवक अखिलेश मध्य प्रदेशच्या टीकमगढ येथील रहिवासी आहे. तो झाशी रेल्वे स्थानकाहून जबलपूर येथे जात होता. अखिलेशनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना झाशीच्या रेल्वे तिकीटाच्या रांगेत त्याच्यासोबत घडली. याच दरम्यान काही लोक त्याच्याजवळ आले आणि त्याच्या चेहऱ्यावर भाजी फेकली. तो डोळे आणि चेहरा स्वच्छ करणार इतक्यातच त्या चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची चेन खेचली व पळ काढला.
अखिलेशनं तातडीनं याची माहिती स्थानिक रेल्वे प्रशासनाला दिली. पण कोणतीही मदत आपल्याला मिळू शकली नाही असा आरोप त्यानं केला आहे. यातच जबलपूरची रेल्वे देखील आली ज्यात त्याला चढावं लागलं आणि रेल्वेत चढल्यानंतर अखिलेश यानं घडलेल्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
रेल्वेत चढला नसता तर मदतीची शक्यता होती- पोलीस
विना तिकीट रेल्वे प्रवास केल्यामुळे अखिलेशवर टीसीनं कारवाई केली आणि दंड भरण्याची मागणी केली. अखिलेश यानं दिलेल्या माहितीनुसार तो दंडाची रक्कम भरण्यासाठी देखील तयार झाला. पण तरीही टीसी आणि पोलिसांनी त्याची कोणतीही मदत केली नाही. तर घटनास्थळावर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार अखिलेश यानं रेल्वेत न चढता तातडीनं पोलिसात तक्रार केली असती तर मदत करता आली नसती. सणासुदीच्या काळामुळे रेल्वेसह इतर सर्वच सार्वजनिक ठिकाणी लोकांची मोठी गर्दी उसळत आहे. अशात अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.