झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर 'ईडी'ची कारवाई, अनेक ठिकाणी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:02 AM2024-01-03T11:02:38+5:302024-01-03T11:03:43+5:30
Jharkhand CM Hemant Soren, ED Raids: ज्या लोकांवर छापे टाकले जात आहेत, त्यांचे राजकीय वर्तुळात चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jharkhand CM Hemant Soren, ED Raids: झारखंडचेमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अशा अनेक व्यावसायिकांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने अनेक व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. हे छापे अजूनही सुरू आहेत. ईडी अर्धा डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकत आहे. ज्या लोकांवर छापे टाकले जात आहेत, त्यांचे राजकीय वर्तुळात चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर खाणकाम, मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी रांचीसह राजस्थानमधील दहाहून अधिक ठिकाणी छापेमारी करत आहे. सीएम सोरेन यांचे मीडिया सल्लागार अभिषेक प्रसाद यांचेही नाव यामध्ये आहे, त्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. हजारीबागचे डीएसपी राजेंद्र दुबे आणि साहिबगंजचे जिल्हा दंडाधिकारी राम निवास यांच्या आवारातही छापे टाकले जात आहेत.
राजस्थानमधील राम निवासच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात येत आहे. यासोबतच विनोद कुमार नावाच्या आरोपीच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. रोशन खोडनिया भाई, पिस्का मोड, रातू रोड, रांची, देवघरचे माजी आमदार पप्पू यादव, अभय सरोगी, कोलकाता येथील अवधेश कुणार यांच्या घरांचीही ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत. या सर्वांवर अटकेची टांगती तलवार आहे. हे सर्व लोक सीएम हेमंत सोरेन यांच्या जवळचे मानले जातात.
'ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे'
दुसरीकडे ईडीच्या या कारवाईवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते उदित राज म्हणतात की सरकार विरोधकांच्या विरोधात ईडीचा वापर करत आहे. ते म्हणाले की, झारखंडचेमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या लोकांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत, तर छत्तीसगड निवडणुकीदरम्यानही भूपेश बघेल यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते, ते ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले.