तरुणींची छेड काढणाऱ्याला दिली अनोखी शिक्षा, करायला लावलं रक्तदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:02 PM2021-11-18T18:02:52+5:302021-11-18T18:04:01+5:30
झारखंडमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (RIMS) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतं. आता एका वेगळ्याच कारणासाठी या इन्स्टिट्यूटची चर्चा आहे.
झारखंडमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (RIMS) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतं. आता एका वेगळ्याच कारणासाठी या इन्स्टिट्यूटची चर्चा आहे. रिम्सच्या (RIMS) गर्ल्स हॉस्टेलजवळ एक तरुण नेहमी मुलींची छेड काढायचा मग एकदा सर्व मेडिकल विद्यार्थ्यांनी त्याला पकडून एक अनोखी शिक्षा दिली आणि त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
विद्यार्थ्यांनी संबंधित तरुणाला मेडिकल विद्यार्थिंनीची छेड काढताना रंगेहाथ पकडलं. मग तरुणाकडून रक्तदान शिबीरात रक्तदान करण्याची शिक्षा द्याला देण्यात आली. त्यानंतर त्याच्या पालकांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यासमोरच समज देऊन तो पुन्हा असं करणार नाही याची ग्वाही घेण्यात आली. आर्मी कॉलनीतील रहिवासी असलेला हा तरुण गेल्या ६ दिवसांपासून इन्स्टिट्यूटजवळील गर्ल्स हॉस्टेलजवळ उभा राहून अश्लील चाळे करुन तरुणींची छेड काढत होता. संध्याकाळी विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये परतत असताना अश्लीन इशारे करुन तो त्रास देत होता.
हॉस्टेलमधील विद्यार्थिंनींनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एकदा न राहवून मुलींनी आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी छेड काढणाऱ्या तरुणाला पकडलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्याचा धाक दाखवण्यात आल्यानंतर त्यानं आपला गुन्हा कबुल केला आणि माफी मागू लागला. पण डॉक्टर विद्यार्थ्यांनी त्याला एका अटीवर सोडण्याची तयारी दाखवली. रक्तदान करुन चांगलं काम करण्याची अट त्याच्यासमोर ठेवण्यात आली आणि ती संबंधित तरुणानं मान्य केली.
संबंधित तरुणानं अधिकृतरित्या इन्स्टिट्यूटमध्ये आजोयित रक्तदान शिबीरात रक्तदान केलं. त्यानंतर त्याच्या पालकांना बोलविण्यात आलं आणि त्यांच्याकडे सोपविण्यात आलं. दरम्यान, या तरुणाकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार याआधी देखील करण्यात आल्या होत्या. पण विरोध आणि धाक दाखवूनही तो थांबायला तयार नव्हता. अखेर त्याला पकडून पोलिसांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यानं केलेली चूक मान्य करत माफीनामा केल्यानं डॉक्टरांनी त्याला रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं.