मुलींना अशा-अशा ठिकाणी मारले की...; जेएनयू मारहाणप्रकरणी अभाविपचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:06 PM2020-01-06T18:06:02+5:302020-01-06T18:11:39+5:30
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी देशभरात संताप व्यक्त होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या जेएनयुबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर जमले आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मास्कधाऱ्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह अनेकांना हॉस्टेलमध्ये घुसून जखमी करण्यात आले. हे कृत्य अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप होत असतानाच अभाविपनेही डाव्या संघटनांवर गंभीर आरोप केले आहेत.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी देशभरात संताप व्यक्त होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या जेएनयुबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. ही मारहाण उजव्या विचारांच्या संघटना म्हणजेच अभाविपने केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला होता. यावर आज सोमवारी अभाविपने उलटा आरोप केला आहे.
अभाविपच्या विद्यार्थ्यांनी डाव्या संघटनांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. हिवाळी सेशनच्या रजिस्ट्रेशनवरून वाद सुरू झाला होता. यानंतर पीस मार्चच्या बहाण्याने 700 लोक एकत्र आले होते. त्यांनीच सर्व्हर रूमची तोडफोड केली कारण रजिस्ट्रेशन प्रक्रिया ठप्प व्हावी, असा आरोप अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्याने केला आहे.
या 700 जणांनी मिळून जखमी झालेल्या 20 जणांवर हल्ला केला. ते पेरियार हॉटेलमध्ये लपले होते. तेव्हा त्यांच्यावर दगड फेकण्यात आले. आम्हाला नाव घेऊन घेऊन शोधले जात होते. या गटामध्ये आयईसाचे सतीश चंद्र यादव सर्वात पुढे होते. माझ्यासोबत काही मुलीही होत्या. त्यांना अशा जागी मारण्यात आले की सांगूही शकत नाही, असे एका विद्यार्थीनीने सांगितले.
जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी मास्कधारक हल्लेखोरांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच काही जणांची ओळख पटविल्याचे समजत आहे.