JNU Attack : मुंबईत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:55 PM2020-01-07T21:55:24+5:302020-01-07T22:00:24+5:30
फ्री काश्मीरचा बॅनर दाखवणाऱ्या तरुणीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल
मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर आणि शिक्षकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आणि हुतात्मा चौक येथे काही जणांनी आंदोलन छेडले होते. मात्र, पोलिसांची परवानगी न घेतल्याने कायदा व सुव्यवस्थेला अडसर निर्माण केल्याप्रकरणी कुलाबा आणि माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए मार्ग) पोलिसांनी प्रत्येकी दोन - दोन गुन्हे आंदोलकांविरोधात दाखल केले आहेत.
जेएनयू आंदोलनाप्रकरणी मुंबईत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 7, 2020
JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली
फ्री काश्मीरचा बॅनर दाखवणाऱ्या तरुणीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी सांगितले. तसेच कुलाबा पोलीस ठाण्यात गेट वे ऑफ इंडिया येथे परवानगीशिवाय बेकायदेशिररित्या जमाव केल्याप्रकरणी सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, उमर खालीद व इतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय फ्री काश्मिरचा बॅनर दाखवणारी मेहेक प्रभु या तरुणीविरोधात भां. द. वि. कलम १५३ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने
तिसरा गुन्हा हा एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, उमर खालीद यांच्यासह ३१ आंदोलकांवर दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनकर्त्यांनी हुतात्मा चौकापासून गेटवेपर्यंत विनापरवानगी मोर्चा काढला होता. तर चौथा गुन्हा हुतात्मा चौकात निदर्शने केल्यामुळे एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.