माणुसकीला काळीमा! ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; रक्ताच्या थारोळ्यात सापडली चिमुकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:02 AM2024-08-19T11:02:19+5:302024-08-19T11:12:18+5:30
जोधपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हरीश सिंधी असं आरोपीचं नाव आहे.
देवनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिराबाहेर आपल्या आईसोबत झोपलेल्या ३ वर्षांच्या निष्पाप मुलीला एका तरुणाने पळवून नेलं. सकाळी सहा वाजता चारा विकणाऱ्या या महिलेला मुलगी एका कपड्यात गुंडाळलेली दिसली. तिने याबाबत लगेचच कुटुंबीयांना माहिती दिली. मुलीसोबत झालेल्या या भयंकर प्रकाराची माहिती आई-वडिलांना दोन तासांनंतर मिळाली. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
एसीपी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपीचं सीसीटीव्ही व्हिडीओ फुटेज मिळालं. व्हिडिओमध्ये आरोपी मुलीला आपल्या खांद्यावरून घेऊन जाताना दिसत आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. अभय कमांड सेंटरमध्ये कॅमेरे तपासून आरोपीला पकडण्यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत मंदिराजवळ होती. मिळालेल्या माहितीनुसार, आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आरोपी झोपलेल्या मुलीला घेऊन गेला. सीसीटीव्ही व्हिडीओ फुटेजमध्ये आरोपी लहान मुलीला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धकका बसला आहे.