पत्रकारावर हल्ला, पाच जणांना अटक; सूत्रधाराचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 08:53 PM2022-02-06T20:53:58+5:302022-02-06T20:54:19+5:30
Attack on Journalist :सूत्रधार गौरव शर्माचा पोलिस शोध घेत आहेत. शर्माच्या अटकेनंतर हल्ल्यामागचे कारण समोर येणार आहे.
डोंबिवली: पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर गुरूवारी झालेल्या हल्लाप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या हल्ल्याचा सूत्रधार गौरव शर्माचा पोलिस शोध घेत आहेत. शर्माच्या अटकेनंतर हल्ल्यामागचे कारण समोर येणार आहे.
कांदू यांचे पुर्वेकडील नामदेव पथ परिसरात आरती स्वीट मार्ट नामक दुकान आहे. गुरूवारी दुपारी ते दुकानात बसले असताना एक तरु णी त्यांच्या दुकानात आली. आणि तीने काही वस्तू खरेदी केल्या. दुकानाबाहेर पडल्यावर तीने रिक्षातील तीन जणांना कांदू यांच्या दिशेने इशारा केला. त्यांनी दुकानात घूसून कांदू यांना मारहाण केली त्यानंतर ते निघून गेले. या प्रकरणी कांदू यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस सुद्धा करीत होते.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर, नवनाथ कवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी गुरुनाथ जरग, विश्वास माने, बालाजी शिंदे, गोरक्ष शेकडे, बापू जाधव, महेश साबळे, बेलदार, महीला पोलीस हवालदार ज्योत्स्ना कुंभारे आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी ज्या रिक्षातून पळून गेले होते ती रिक्षा शोधून काढली. रिक्षा शोधल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल खांडेकर , अमोल सावंत यासह ऐका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री ताब्यात घेऊन टिळकनगर पोलिसांच्या हवाली केले. तर किर्ती अमोलकर हिला रविवारी अटक केली. अटक आरोपींनी गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीने कांदू यांच्यावर हल्ला करण्यास सांगितले होते अशी कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. शर्माने कोणाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केले आहे का या मागे काही राजकीय षडयंत्र किंवा भूमाफियांचा हात आहे का याचा खुलासा शर्माच्याअटकेनंतर होणार आहे.