पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; महिला डॉक्टरचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 06:06 PM2020-09-27T18:06:54+5:302020-09-27T18:07:45+5:30
रुग्णावर उपचारामध्ये हेळसांड केल्याच्या प्रकारामुळे जेम्बो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून चर्चेत आले आहे. विनयभंग प्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : रुग्णांवरील उपचारामुळे सुरु झाल्यापासून वादात सापडलेल्या जम्बो हॉस्पिटलमधील महिला डॉक्टराचाविनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या दोघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ योगेश भद्रा व अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
रुग्णावर उपचारामध्ये हेळसांड केल्याच्या प्रकारामुळे जेम्बो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून चर्चेत आले आहे. तेथील व्यवस्थापन बदलल्यानंतर त्यात काहीशी सुधारणा झाली होती़ त्यानंतर गेल्या आठवड्यात येथे दाखल केलेल्या रुग्ण महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर डिस्चार्ज देण्यात आला होता़ रुग्ण महिलेच्या आईने जेम्बो हॉस्पिटलबाहेर उपोषण सुरु केल्यानंतर तिचा शोध सुरु झाला़ पोलिसांना ती शनिवारी पिरंगुट घाटात आढळून आली होती़ त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर व आरोपी डॉक्टर हे शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करतात़ दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टर ड्युटीवर असताना त्यांच्याशी दोघा आरोपींनी अश्लिल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला़ मागील एक महिन्यांपासून डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार सुरु होता, असे समजते़ त्यांनी ही बाब तेथील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती़ तरीही डॉक्टरांकडून तिचा विनयभंग झाल्याने शेवटी तिने शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली़ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.