पंधरा हजाराची लाच स्वीकारताना महावितरणचा कनिष्ठ अभियंता जेरबंद
By राजेश भोस्तेकर | Published: January 24, 2023 03:55 PM2023-01-24T15:55:17+5:302023-01-24T15:57:55+5:30
घराचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मागितली होती लाच
राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: घराचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मागितलेल्या लाचे प्रकरणी मुरुड विभागातील कोकबन मधील ओम विश्वनाथ शिंदे वय 29 वर्षे कनिष्ठ अभियंता यास लाच लुचपत पथकाने १५ लाच स्वीकारताना अटक केली आहे. त्यामुळे महावितरण मध्ये लाचखोरी प्रकरण समोर आले आहे.
तक्रारदार याच्या कोकबन गावातील राहत्या घराचा वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी खंडित केला होता. याबाबत तक्रारदार यांनी कोकबन विभागाचे कनिष्ठ अभियंता ओम शिंदे याच्याशी संपर्क केला होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १५ हजार देण्याचे निश्चित झाले.
तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे उपविभागीय लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून शिंदे यांनी १५ हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. लाच लुचपत विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सुषमा सोनावणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रनजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागले, पोना जितेंद्र पाटील यांनी यशस्वी कारवाई केली.