पंढरपूरला खिसे कापायला निघालेली चोरट्यांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 07:21 PM2018-07-23T19:21:52+5:302018-07-23T19:23:33+5:30
सोनसाखळी चोरांची हरियाणा, राजस्थानची सराईत गॅंग अटकेत
मुंबई - पनवेल आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात हातचलाखी करून सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हांतील आरोपींचा शोध घेत असताना मुंबईत रेल्वे स्थानकात चोरी करणारी सराईत गॅंग पोलिसांच्या हाती लागली. या गॅंगचे लक्ष्य होते पंढरपूरची आषाढी एकादशी. एकादशी दिवशी भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन या ७ जणांच्या टोळक्याला अनेकांचे लुटायचे होते असे पोलिसांनी सांगितले.
१९ जुलैला ७० वर्षीय हाजरबी इब्राहिम शेख या विक्रोळीत राहणाऱ्या महिलेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वरून बोरिवलीकरीत स्लो लोकल पकडत असताना अज्ञात चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची तक्रार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे केली होती. तर अशाच प्रकारचा गुन्हा पनवेल रेल्वे स्थानकावर घडल्याने अलका निकाळजे यांनी तक्रार दाखल केली होती. दोन्ही गुन्ह्यात साधर्म्य असल्याने तात्काळ दोन्ही गुन्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही गुन्ह्यात तक्रारदारांच्या आजूबाजूस प्रवासी म्हणून वावरणारे पुरुष व महिला सारख्याच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या टोळी बनवून वावरणाऱ्या चोरांचा मागोवा घेऊन रेल्वे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. हि टोळी हरियाणा आणि राजस्थान राज्यातील असून रेल्वे स्थानकं, यात्रा, धार्मिक उत्सव अशा गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून चोऱ्या करते असे तपासात उघड झाले आहे. याच अनुषंगाने हि टोळी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यास २१ जुलैला महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पंढरपूर येथे रवाणा झाले. दरम्यान सोलापूर पोलिसांचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना व्हॉट्सऍपद्वारे याबाबत माहिती देण्यात आली होती. सोलापूर पोलिसांच्या मदतीने पंढरपूर येथे वारीसाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी आलेली टोळी पंढरपूरला पोहचण्याआधीच करकम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीत ३ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. मेघशाम सोळंकी (वय - २४), अर्जुन चौव्हाण (वय - १९), रिता सोळंकी (वय - २३), रीना चौव्हाण (वय - २५), रश्मी चौव्हाण (वय - १९), ममताकुमारी चौव्हाण (वय -२०) हे सर्व हरियाणा तर शशीकुमार चौव्हाण (वय - ३६) हा राजस्थानला राहणार आरोपी आहे. या चोरांकडून ९० हजार किंमतीच्या दोन सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
हि टोळी एकटी महिला प्रवास करत असल्याचे हेरून आजू बाजूस सहप्रवासी असल्याचे भासवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी वा वस्तू चोरी करत असल्याचे तपात उघड झाले आहे. मात्र, पोलिसांच्या या कारवाईमुळे पंढरपुरातील या चोरट्यांचा होऊ घातलेला पूर्वनियोजित कट उधळला आहे.