आठ लाखांचे दागिने लुटून सराफाचा खून; संशयिताला नाशकात ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:27 PM2021-06-01T19:27:24+5:302021-06-01T19:27:49+5:30
The suspect was handcuffed in Nashik : नाशिकरोडमधून बांधल्या मुसक्या ;११ तोळ्यांचे दागिने, चार किलो चांदी घेऊन झाला होता फरार
नाशिक : बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील एका सराफ व्यावसायिकाचा मागील महिन्यात खून करुन त्यांच्या ताब्यातील ११ तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदी घेऊन फरार झालेल्या मुख्य संशयित आरोपीच्या नाशिक गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन नाशिकरोडच्या अरिंगळे मळ्यातून मुसक्या बांधल्या. ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (२१, रा. शिरुरगाव, जि. बीड) असे या संशयिताचे नाव आहे.
शिरुर कासार येथील सराफ व्यावसायिक विशाल कुलथे यांनी संशयित ज्ञानेश्वरची सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ऑर्डर स्विकारली होती. २० मे रोजी सायंकाळी विशाल हे ज्ञानेश्वरच्या दुचाकीवर बसून दागिने देण्यासाठी गेले. मात्र त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाही. सखोल चौकशीत विशाल व ज्ञानेश्वर एकाच दुचाकीवरुन सोबत गेल्याचे दिसले. त्यानंतर ज्ञानेश्वर हा फरार झाला होता. बीड पोलिसांनी तपास केला असता ज्ञानेश्वर याने इतर संशयितांच्या मदतीने विशाल यांचा खून करुन त्यांच्याकडील ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ४ किलो चांदी असे ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांचे दागिन्यांची लूट केल्याचे उघडकीस आले. तसेच विशाल यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यात पुरला. गुन्हा केल्यानंतर ज्ञानेश्वर नाशिकला आश्रयास असल्याची माहिती तेथील पोलिसांकडून शहर पोलिसांना मिळाली. याबाबत गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली असता वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांनी पथक तयार केले. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, रवींद्र बागुल, नाझीम पठाण, दिलीप मोंढे, विशाल काठे यांच्या पथकाने अरिंगळे मळ्यात सापळा रचला. तेथून ज्ञानेश्वर यास शिताफिने अटक करण्यात आली.
पत्नीसोबत होता वास्तव्यास
पोलिसांनी ज्ञानेश्वर यास खाकीचा हिसका दाखवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अरिंगळे मळा परिसरात ज्ञानेश्वर हा त्याच्या पत्नीसोबत घटना घडल्यापासून वास्तव्यास आला होता. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार आणि मुद्देमाल आदींच्या तपासासाठी त्याचा ताबा पुढील तपासाकरिता बीड पोलिसांकडे सोपिवण्यात आला आहे. विशाल यांचे बंधु कैलास सुभाष कुलथे यांच्या फिर्यादीनुसार बीडमध्ये ज्ञानेश्वरविरुध्द खुन, जबरी लूटीचा गुन्हा दाखल आहे.