कल्याण-डोंबिवलीत बलात्कारांचे गुन्हे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:50 PM2020-02-10T23:50:36+5:302020-02-10T23:51:22+5:30

सोनसाखळी चोर मातले : खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी यामध्ये घट

Kalyan-Dombivali rape crime increased | कल्याण-डोंबिवलीत बलात्कारांचे गुन्हे वाढले

कल्याण-डोंबिवलीत बलात्कारांचे गुन्हे वाढले

Next

सचिन सागरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांना लक्ष्य केले जात असले, तरी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात यश मिळवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. २०१९ या वर्षात त्यामागील २०१८ या वर्षाच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीचा आलेख उतरल्याने पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ या वर्षात हत्यांचे प्रमाण केवळ तीनने, हत्येच्या प्रयत्नांची संख्या १६ ने, दरोड्यांची संख्या सहाने, जबरी चोरीच्या घटना १२ ने, बलात्कार पाचने वाढले असले, तरी विनयभंग ३३ ने घटले आहेत, असा पोलिसांचा दावा आहे. दरोड्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी दरोड्यांच्या तयारीत असलेल्यांच्या अटकेचे प्रमाण चारने तर, सोनसाखळी चोरीचे प्रमाण २१ ने वाढले आहे. त्यामुळे, हे प्रमाण कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत आठ पोलीस ठाणी आहेत. या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाढती लोकसंख्या, अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता आदी समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. मात्र, २०१९ या वर्षात पोलिसांना गुन्हेगारीला आळा घालण्यात यश आले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील गुन्हेगारी कमी झाली आहे. २०१८ मध्ये २५ हत्या झाल्या होत्या, तर २०१९ मध्ये २२ हत्या झाल्या आहेत. २०१८ मध्ये जबरी चोरीच्या २०१ घटना घडल्या होत्या, ते प्रमाण १२ ने घटून १८९ झाले आहे. इतर जबरी चोरीच्या घटना १४८ वरून ११५ एवढ्या कमी झाल्या आहेत.


विनयभंगाच्या घटना कमी झाल्या असल्या, तरी बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ७४ बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१९ मध्ये पाचने वाढ झाली. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये २१ ने वाढ झाली आहे. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल झालेली नाही. त्यामुळे ते आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.


पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यात झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेमध्ये पार पडल्या. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.
- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ-३

Web Title: Kalyan-Dombivali rape crime increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.