Kalyan : नेवाळी 'प्रॉपर्टी' फसवणूक प्रकरण; पोलिसांनी केली 'कोट्यधीश' आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:04 PM2021-08-19T23:04:53+5:302021-08-19T23:07:43+5:30
चाळ बांधून घरे देतो असं सांगत आरोपीनं केली होती अनेकांची फसवणूक. २०१४ मध्ये फसवणूकीचं प्रकरण अतिशय गाजलं होतं, त्यानंतर दाखल करण्यात आले होते गुन्हे.
मयुरी चव्हाण
कल्याण नजीक असलेल्या नेवाळी परिसरातील भारतीय नौदलाच्या ताब्यातील जमिन आहे. यावर अनधिकृत बांधकाम करुन त्यावर चाळी बांधून देतो व विकतो असे भासवत अनेक गरीब लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१४ साली कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात होते. याप्रकरणातला पडद्यामागचा प्रमुख सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला असून थेट नवी मुंबईतूनपोलिसांनी त्याला अटक केली आहे. माजीद अली उर्फ गुड्डू मन्सूर अली शेख (रा.घाटकोपर) असे या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या ७ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार झाला होता. विशेष बाब म्हणजे न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याच लखनऊ येथील सुमारे पावणे दोन कोटींच घर जप्त करून लिलावाचे आदेश देऊनही माजिद अली हजर झाला नव्हता. अखेर कल्याण क्राईम ब्रान्चने या 'कोट्यधीश' आरोपीला अटक केली आहे.
माजिद अली हा नवी मुंबई नजीक असलेल्या कामोठे परिसरात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार क्राईम ब्राँचने याबाबत खात्री केली आणि माजिद अलीचा सध्याचा फोटो प्राप्त करून सापळा त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण एम.दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कमळकर, साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे,मंगेश शिर्के यांच्या टीमने याप्रकरणी महत्वाची भूमिका बजावली आहे.
माजिद अलीवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन, तर उत्तर प्रदेश येथील जिल्हा गोंडामधील खोडारे पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. नेवाळी येथील जमिनींवर अनधिकृतप बांधकाम करून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी एकाला न्यायालयाने ३ वर्षे, तर दुसऱ्या आरोपीला ५ वर्ष शिक्षा सुनावली होती. आता माजिद अली या मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत असून फसवणूकीचे अनेक प्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कशा पद्धतीने करायचा फसवणूक?
नेवाळी परिसरातील नौदलाच्या जागेवर विविध कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने लोकांना चाळी बांधून देतो आणि विकतो असे सांगत माजिद अली व त्याच्या साथीदारांनी अनेक गरीब लोकांची फसवणूक केली होती. २०१४ मध्ये हे प्रकरण चांगलंच गाजलं होत. अनेक फसवणूकीचे प्रकार पुढे आले होते. यापैकी महात्मा फुले पोलीस ठाण्यात देखील दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. कल्याण क्राईम ब्राँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा यांनी दिलेल्या माहितीनुसार माजीद अली उर्फ गुड्डू हा एका व्यक्तीला कंपनी स्थापन करायला लावायचा. मग ही व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला सोबत घेऊन बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा करायची. मग हे पैसे गुड्डूपर्यंत पोहचवण्याचं काम केलं जायचं. अशा प्रकारे माजिद अली हा पडद्यामागे राहून सर्व सूत्र सांभाळत होता. इतकेच नाही तर कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली त्याने अनेक बनावट ऑफिसदेखील उभे केले होते.
माजिद अलीला कशी केली अटक?
हा आरोपी स्वत:च्या नावाने सिम कार्ड, बँक खाते इत्यादी कोणत्याच गोष्टी वापरत नव्हता. त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना कठीण जात होतं. मात्र गोपनीय सूत्रांकडून पोलीसांना माजिद अली हा कामोठे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला अटक करण्यात आली.