कल्याणी बारोले खुन प्रकरण; शरीरसुखाला नकार दिल्याने खून केल्याची आरोपींची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 02:26 PM2018-09-07T14:26:30+5:302018-09-07T14:28:30+5:30
कल्याणी घरात एकटी असताना तिला शरीरसुखाची मागणी केली, मात्र तिने नकार देऊन पोलिसात तक्रार देण्याची धमकी देताच, या दोघांनी महिलेचा साडीने गळा आवळून हत्या केली.
अकोला : जुने शहरातील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी ४० वर्षीय कल्याणी बारोले हिच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. अमोल अशोक अढाव व अब्दुल इम्रान अब्दुल साबीर असे आरोपींची नावे असून, आरोपींनी खुनाची कबुली दिली. २९ आॅगस्टच्या रात्री कल्याणी घरात एकटी असताना तिला शरीरसुखाची मागणी केली, मात्र तिने नकार देऊन पोलिसात तक्रार देण्याची धमकी देताच, या दोघांनी महिलेचा साडीने गळा आवळून हत्या केली.
रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी नारायण मुरलीधर मानवतकर यांच्या शेजारी अकिलाबी नामक महिलेच्या घरात कल्याणी रामलाल बारोले (४0) ही महिला भाड्याने राहात होती. तिने हनिफ नवरंगाबादी नामक इसमासोबत विवाह केला होता. शुक्रवार, ३१ आॅगस्टच्या दुपारी परिसरात दुर्गंधी पसरली. ही दुर्गंधी या महिलेच्या घरातून येत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी घटनास्थळ गाठून घर उघडले असता, घरामध्ये कल्याणी बारोले हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तिचा पती हनिफ नवरंगाबादी (रा. गवळीपुरा) आणि पवन वंजारी यांची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीत या दोघांचा खून प्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी पथकाचे गठन करून तपास सुरू केला असता, अमोल अशोक अढाव व अब्दुल इम्रान अब्दुल साबीर दोघेही रा. रमाबाई आंबेडकर नगर यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करताच दोघांनीही कल्याणीच्या खुनाची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्यासह पथकाने केली.