काम होने दो, बडी रक्कम मिलेगी; शुटर्सना ऑफर; सिद्दिकींचा फोटो आणि फ्लेक्सही दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:42 AM2024-10-15T10:42:28+5:302024-10-15T10:42:44+5:30
हत्येचा कट शिजल्यानंतर शिवकुमारला मुंबईत जाऊन कुर्ला भागात भाड्याने घर शोधण्याची जबाबदारी दिली. शिवकुमारने मुंबईत येत कुर्ला परिसरात फिरून दलालाच्या मदतीने पोलिस पटेल चाळीत घर शोधले.
मुंबई : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या गुरुमेल सिंग आणि धर्मराज कश्यपच्या चौकशीत त्यांना ठरावीक रक्कम न ठरवता थेट, “काम होने दो, बडी अमाउंट मिलेगी” असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, त्यांना बाबा सिद्दिकी यांचा फोटो आणि फ्लेक्सही देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हत्येचा कट शिजल्यानंतर शिवकुमारला मुंबईत जाऊन कुर्ला भागात भाड्याने घर शोधण्याची जबाबदारी दिली. शिवकुमारने मुंबईत येत कुर्ला परिसरात फिरून दलालाच्या मदतीने पोलिस पटेल चाळीत घर शोधले. त्यानंतर सप्टेंबरपासून तो राहायला आला. त्यापाठोपाठ कश्यप आणि काही दिवसाने गुरुमेल त्याच्याकडे राहायला आला. यामध्ये गुरुमेल आणि शिवकुमारकडे गोळीबार करण्याची जबाबदारी होती, तर कश्यपकडे गोळीबार केल्यानंतर खाज येणारा स्प्रे मारण्याची जबाबदारी होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
७ फुटांवरून गोळीबार
बाबा सिद्दिकी मुलाच्या कार्यालयातून बाहेर येताच सहा ते सात फुटांच्या अंतरावरून शिवकुमारने अंदाधुंद गोळीबार केला. यापैकी तीन गोळ्या सिद्दिकी यांना लागल्या, तर एक गोळी विसर्जन मिरवणुकीतील एकाला लागली.
एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे तपासात समोर आले. गोळीबारानंतर कश्यपने स्प्रे मारल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, ते अंतर लांब असल्याने त्याचा जास्त कुणाला त्रास झाला नाही.
दिले होते फक्त लक्ष्य
- आरोपींना फक्त टार्गेट दिले होते. मात्र, ते कशासाठी आणि मुख्य सूत्रधार कोण आहे? याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी गुन्हे शाखेला सांगितले आहे.
- याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, प्रवीण लोणकरला जबाबदारी कोणी दिली, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
- या आरोपींच्या रडारवर आणखी कोणी होते का? याबाबतही अधिक तपास सुरू आहे.