ताे विश्वासू होता, म्हणून...; कांदिवली हत्याकांड रागाच्या भरात की पूर्वनियोजित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 06:51 AM2022-07-03T06:51:54+5:302022-07-03T06:52:17+5:30
मालकिणीची हत्या, चालकाची चाैकशी
मुंबई : कांदिवली हत्याकांड हे रागाच्या भरात घडले की ते पूर्वनियोजित होते याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. त्यासाठी कुटुंबप्रमुख आशिष दळवी यांचा जबाब नोंदविण्यात येणार असून, त्यानंतरच या रहस्यमयी प्रकरणातील बरीच कोडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीत शिवदयाल सेन (६०) हा त्यांचा विश्वासू असल्यामुळे त्याला कुटुंबासोबत ठेवले होते असे म्हटले असून, सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर सध्या पडताळला जात आहे.
आशिष हे शुक्रवारी मुंबईत पोहोचले. पोलिसांना भेटल्यानंतर त्यांनी शताब्दी रुग्णालय गाठले. या घटनेमुळे त्यांना जबर धक्का बसला असून, याप्रकरणी सोमवारी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी जबाब नोंदविल्याचे तपास अधिकारी म्हणाले. सेन माझा विश्वासू होता, म्हणून त्याला बायको, पोरांकडे ठेवले होते. गेली दहा वर्षे त्याने प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्याचे मुंबईत कोणीही नाही, अशी माहिती दळवी यांनी पोलिसांना दिली.
घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची स्थिती आणि सुसाइड नोटवरून किरण आणि मुस्कान यांची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर भूमी आणि सेन यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांना विश्वास आहे.
किरण आणि मुस्कानचा मृत्यू घटनास्थळावरून सापडलेल्या विळ्याने झालेल्या जखमांमुळे, तर भूमी आणि सेन यांचा मृत्यू श्वासोच्छ्वास थांबल्यामुळे झाला. गेली अनेक वर्षं बंद असल्याने या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि आजूबाजूच्या कॅमेऱ्यांच्या मदतीने आत काय घडले हे तपासण्यात मदत होणार नाही. त्यानुसार इंदूर भेटीत काही संशयास्पद घडले का, याचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.