बिल्डरचा धक्कादायक कारनामा, वृद्ध महिलेला घरातून बेदखल करण्यासाठी घरात ठेवलं चरस!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 10:34 AM2022-06-02T10:34:12+5:302022-06-02T10:35:01+5:30
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बिल्डरनं ७५ वर्षीय दिव्यांग महिलेला घरातून बेदखल करण्यासाठी तिच्या नकळत घरात चक्क चरस आणून ठेवले आणि क्राइम ब्रांचला पाचारण केलं.
कानपूर-
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बिल्डरनं ७५ वर्षीय दिव्यांग महिलेला घरातून बेदखल करण्यासाठी तिच्या नकळत घरात चक्क चरस आणून ठेवले आणि क्राइम ब्रांचला पाचारण केलं. पोलिसांनी जेव्हा संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा बिल्डरचा कारनामा उघडकीस आला आणि पोलीसही हैराण झाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक बिल्डर आतिफ यानं संबंधित वृद्ध महिलेशी घर खरेदीचा करार केला होता. वृद्ध महिला हमीदा बाईनं घर खाली करण्याआधी त्यानं घराचं पिण्याचं पाणी देखील बंद केलं. तरीही घर खाली होत नसल्यानं आतिफ यानं चक्क आपल्या सहकाऱ्याकरवी तिच्या घरात दिड किलो चरस ठेवलं. त्यानंतर क्राइम ब्रांचला हमीदा बाई कुख्यात चरस-गांजाची डीलर असल्याची माहिती दिली. नुकतंच तिच्या घरात नवीन माल आला असल्याची टीप पोलिसांना दिली.
माहिती मिळताच क्राइम ब्रांचची टीम बेकनगंज पोलिसांना घेऊन हमीदा बाईच्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यावर जेव्हा हमीदा बाई आजारी आणि अंथरुनाला खिळून असल्याचं पोलिसांनी पाहिलं तर स्वत: पोलीसच चक्रावून गेले. डीसीपी प्रमोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसीर आम्ही तिथं चौकशी केली आणि चरस असल्याची माहित देणाऱ्या मुखबिर गुरफान याला जेव्हा खोलात जाऊन याबाबत विचारलं तेव्हा त्यानं सारी माहिती दिली. आपल्या मालकानं म्हणजेच बिल्डर आतिफ यानं घर खाली करण्यासाठी आपल्यालाच या महिलेच्या घरात चरस ठेवण्यास सांगितल्याचं मुखबिर यानं कबुल केलं.
वृद्ध महिलेच्या मुलीनं देखील आतिफ यानं याआधीही अनेकदा अशाचप्रकारे आपल्या आईला त्रास दिला असल्याचं सांगितलं. "आम्ही मिळालेल्या माहितीनुसार या घरात चरस ठेवल्याच्या संशयातून छापेमारी केली. चरस जप्त देखील करण्यात आली. पण जेव्हा आम्ही घरात असलेल्या वृद्ध महिलेची परिस्थिती पाहिली तर आम्हाला संशय आला. याची सखोल चौकशी केली तेव्हा कळलं की आतिफ नावाच्या बिल्डरनं वृद्ध महिलेनं घर खाली करावं यासाठी असा बनाव रचला होता. चरस ठेवणाऱ्या गुरफान याला अटक केली असून बिल्डर आतिफ याचा शोध घेत आहोत", असं कानपूर ईस्टचे डीसीपी प्रमोद कुमार यांनी सांगितलं.