मर्डर मिस्ट्री! दिरावर जीव जडल्याने नवऱ्याचा काढला काटा; ८ महिन्यांनी असा झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:27 PM2024-11-11T12:27:21+5:302024-11-11T12:28:22+5:30
ट्रकचालक पतीची हत्या करून दिरासोबत फरार झालेल्या पत्नीला आठ महिन्यांनंतर मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथून पोलिसांनी अटक केली आहे.
कानपूरमध्ये ट्रकचालक पतीची हत्या करून दिरासोबत फरार झालेल्या पत्नीला आठ महिन्यांनंतर मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथून पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. ते दिवसभर ढाब्यावर काम करायचे आणि संध्याकाळी बागेश्वर धाम येथे सेवा करायचे. आरोपी महिलेने मोबाईल ऑन करताच पोलिसांना तिचं लोकेशन सापडलं.
सीतापूरचा रहिवासी असलेला दिनेश अवस्थी कानपूरच्या खरेसा गावात राहत होता. त्याने २ वर्षांपूर्वी पूनम अवस्थी उर्फ गुडियासोबत लग्न केलं. दिनेशचा भाऊ मनोजही त्याच्यासोबत राहत होता. दिनेश ट्रक घेऊन दुसऱ्या शहरात गेला तेव्हा पूनमचे तिच्या दिरासोबत प्रेमसंबंध होते. २३ एप्रिल रोजी दिनेश अचानक घरी पोहोचला तेव्हा त्याला प्रेमसंबंधांबाबत माहिती झाली.
दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्याने पूनमला मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर पूनमने दिरासह दिनेशला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.दीर आणि पत्नीने मिळून दिनेशचा मृतदेह तलावात फेकून दिला, यानंतर दोघेही घरातून पळून गेले. या प्रकरणी दिनेशच्या लहान भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, मात्र पोलिसांना ते दोघेही सापडले नाहीत.
आठ महिन्यांनंतर, अचानक एके दिवशी आरोपी महिलेचा मोबाईल चालू झाला आणि ती कानपूरमधील एका महिलेशी फोनवर बोलली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता, हे दोघेही मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे सेवादार असल्याचे भासवून आठ महिन्यांपासून लपून बसल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पूनम आणि तिचा दीर मनोजला अटक करण्यात आली.
पोलिसांनी पूनमची चौकशी केली असता तिने दीर मनोजसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. पतीने याला विरोध केला आणि मी आणि दिराने त्याची हत्या केली. यानंतर सकाळी मृतदेह सापडल्यानंतर आम्ही पकडले जाऊ नये म्हणून मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे पळ काढला. त्याआधी आम्ही फोन बंद केले, तिथे आम्ही सेवादार म्हणून काम करू लागलो असं सांगितलं.