१७ राज्यात फसवणूक, परदेशात नेटवर्क, २०० FIR...; गँगचा पर्दाफाश, मास्टरमाइंड आठवी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:16 PM2024-10-16T14:16:11+5:302024-10-16T14:29:26+5:30
शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कानपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कानपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गँग आठवी पास झालेला तरुण चालवत होता. या गँगचं जाळं देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलं आहे. परदेशातही त्यांचं मोठं नेटवर्क आहे.
शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून हे भामटे देशभरात आपलं जाळं पसरवत होते. या गुंडांनी कानपूरच्या एका व्यावसायिकाशी टेलिग्रामवर संपर्क साधून ट्रेडिंगच्या नावाखाली अडीच कोटी रुपये उकळले होते. फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाचे पैसे दुप्पट-तिप्पट केल्याचा दावा केला होता.
देशातील अनेक नागरिकांची या गँगने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. देशभरात २०० हून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, मात्र या गँगचे सदस्य पहिल्यांदाच पकडले गेले आहेत. या गुंडांनी कानपूरमधील सिव्हिल लाइनमध्ये राहणाऱ्या विनोद कुमार यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून शेअर्समध्ये पैसे वाढवण्याचे आमिष दाखवले होते. या ग्रुपवर खोटी माहिती देण्यात येत होती. शेअर्समध्ये पैसे गुंतवून त्यांचे पैसे दुप्पट-तीनपट झाले.
ग्रुपमधील इतक्या लोकांच्या कमेंट्स बघून विनोदही जाळ्यात अडकला. टोळीच्या सांगण्यावरून त्याने हळूहळू १.७८ कोटी रुपये गुंतवले. पण मधल्या काळात अकाऊंट बंद झालं. त्यांचा मोबाईल नंबरही बंद येऊ लागला. त्यानंतर विनोदने पोलिसांत तक्रार केली. सायबर सेलने तपास सुरू केला असता ही गँग भोपाळ येथील रोहित सोनी नावाचा तरुण चालवत असल्याचं आढळून आलं.
पोलिसांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना कळालं की, १७ राज्यातील २५० हून अधिक लोक या गँगच्या जाळयात अडकले आहेत. बळी ठरले आहेत. तसेय या गँगविरुद्ध २३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण गँगमधील लोक कधीच पकडले गेले नाहीत. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहित सोनी, अक्षय, मयंक मीणा या लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कारसह मोबाईल, लॅपटॉप, राऊटर, हार्डडिस्क जप्त केली आहे. हे लोक मध्य प्रदेश आणि बिहारचे रहिवासी आहेत